बोईसर : पालघर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत एक विद्यार्थी कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे.पालघर तालुक्यातील मासवण येथील सूर्या नदीच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या अभिषेक बिऱ्हाडे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला असून डहाणू तालुक्यातील सारणी येथे कालव्याच्या पाण्यात लक्ष मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे.
उन्हाच्या काहिलीने हैराण झाल्यामुळे अनेक जण सध्या जिल्ह्यातील समुद्र, नद्या, बंधारे आणि कालव्याच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून या ठिकाणी जीवरक्षक किंवा सुरक्षित साधनांअभावी अपघाती घटना घडत आहेत. वसई विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील मासवण येथील बंधाऱ्यात होण्यासाठी सध्या तरुणांची मोठी गर्दी होत आहे. शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागल्याने पालघर मनोर आणि स्थानिक परिसरातील अनेक तरुण मासवण येथील बंधाऱ्यात पोहण्याचा आनंद लुटताना दिसतात. शनिवारी दुपारी मासवण येथील बंधाऱ्यात पोहत असताना अभिषेक बिऱ्हाडे (२४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अभिषेक आपल्या मित्रांसमवेत मासवण येथील बंधाऱ्याच्या पाण्यात पोहण्याची मजा लुटण्यासाठी आला होता. मात्र पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. यावेळी घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली. संध्याकाळचा सुमारास अभिषेकचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
दुसऱ्या घटनेत डहाणू तालुक्यातील सारणी येथील सूर्या कालव्यामध्ये पोहत असताना धाकटी डहाणू येथील दक्ष सागर मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिक आणि पोलीस कालव्याच्या खालच्या भागात त्याचा शोध घेत आहेत.
पाण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणांचे तुफान गर्दी:
पालघर जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे सर्वजण अक्षरक्ष हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिली पासून बचाव करण्यासाठी सध्या अनेक जण केळवा, शिरगाव,चिंचणी, डहाणू, बोर्डी येथील समुद्रकिनारे, सूर्या, वैतरणा, देहर्जा, पिंजाळ आणि इतर लहान नद्यांचे पात्र, सूर्या धरणाचे कालवे आणि जव्हार तालुक्यातील बारमाही काळमांडवी या धबधब्यावर तुफान गर्दी करत आहेत. मासवन बंधारा, सारणी आणि रानशेत येथील कालवे आणि काळमांडवी धबधबा येथील पोहण्याचे रिल्स समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या ठिकाणी पोहण्यासाठी तरुणांची दररोज जत्रा भरत आहे. खोल आणि वाहत्या पाण्यात मद्यपान करून उतरणे, अतिउत्साह, पोहण्याचा पुरेसा सराव नसणे, लाइफ जॅकेट सारखा सुरक्षित साधनांचा वापर न करणे, स्थानिकांचा सल्ला धुडकावून खोल आणि धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरणे याचबरोबर पोहाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी प्रशासनाकडून जीवरक्षकांची उपलब्धता आणि धोक्याची सूचना देणारे माहिती फलक नसल्यामुळे सातत्याने पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.
दक्ष मर्दे याचाही मृतदेह मिळाला
सारणी येथे कॅनॉल मध्ये बुडाला होता तेथून १०० मीटर वर त्याचा मृतदेह अडकला होता. सूर्या प्रकल्पाला पाण्याचा प्रवाह तात्पुरता बंद करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. कालव्यातील पाणी बंद केल्यानंतर हा मृतदेह सापडला