बॉलिवूडमध्ये अनेक हास्य कलाकार आले आणि त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं, त्यांचं मनोरंजन केलं. मात्र जॉनी वॉकरने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. म्हणतात ना एखाद्याला रडवणं सोपं असतं, मात्र हसवणं तितकंच कठीण, मात्र जॉनी वॉकर यांच्या पडद्यावर येण्यानेच वातावरणात हास्याचे तरंग निर्माण व्हायचे. कुटुंबियांनी त्यांचं नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काजी असं ठेवलं होतं. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी हे नाव बदलून जॉनी वॉकर असं ठेवलं. त्यांचं हे नाव व्हिस्कीच्या ब्रँडच्या नावावरुन देण्यात आल्याचं म्हटलं जातं. दारूड्या व्यक्तीचा दमदार अभिनय त्यांनी केल्यामुळेच जॉनी वॉकर या व्हिस्कीच्या ब्रँडच्या नावावरून त्यांना नाव दिल्याचं म्हटलं जातं. चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते एक बस कंडक्टर होते आणि त्यांचे वडील मिलमध्ये कामगार होते. मिल बंद पडल्यानंतर त्यांचं पूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. त्यांच्या कुटुंबात एकूण १५ जण होते. वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी जॉनी बस कंडक्टरची नोकरी करू लागले. त्यावेळी ते २७ वर्षांचे होते. कंडक्टरची नोकरी करतानासुद्धा त्यांच्यातील विनोदबुद्धी त्यांना शांत बसू द्यायची नाही. बसमधील प्रवाशांना अनेक किस्से सांगून त्यांना हसवण्याचा ते प्रयत्न करत असत. त्यांच्या या कलेला कधीतरी कोणीतरी वाव देईल हाच त्यांचा यामागे उद्देश होता आणि नेमकं तेच झालं. गुरुदत्त यांच्या ‘बाजी’ या चित्रपटासाठी पटकथा लिहिणारे बलराज साहनी यांची नजर बदरुद्दीन यांच्यावर पडली. साहनी यांनी त्यांची भेट गुरुदत्त यांच्याशी करून दिली. त्यांना मुलाखतीत दारूड्याचं अभिनय करण्यास सांगितलं गेलं. बदरुद्दीन यांच्या अभिनयाने गुरुदत्त इतके प्रभावित झाले की त्यांनी लगेच ‘बाजी’ चित्रपटामध्ये त्यांना भूमिका दिली. या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि रुपेरी पडद्यावरील सर्वोत्तम हास्य कलाकाराचा किताब त्यांनी पटकावला. बदरुद्दीन यांना जॉनी वॉकर हे नाव गुरुदत्त यांनीच दिल्याचं म्हटलं जातं. खरं तर जॉनी वॉकर यांनी जीवनात दारूला कधी हातदेखील लावला नव्हता. प्रेक्षकांना अभिनयाने ते जितके खळखळून हसायला भाग पाडायचे तिथेच भावनिक भूमिका साकारताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रूही आणायचे. ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ चित्रपटातील भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांना भावूक केलं होतं. जॉनी वॉकर आज जरी नसले तरी त्यांच्या पडद्यावरील भूमिका निराश चेहऱ्यावरही हास्य आणतात.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट