-
भूक आणि रागाचा परस्परसंबंध असतो का? याचं उत्तर हो असं द्यावं लागेल. भूक असताना चिडचिड होते, असे म्हणतात. (फोटो पिक्साबे आणि इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)
-
मात्र या दाव्याला नुसताच शास्त्रीय आधार शोधण्याचे काम करण्यात आलं असून भूक आणि चिडचिड होण्याचा संबंध संशोधकांनी शोधून काढला आहे.
-
ब्रिटनमधील अँग्लिया रस्किन विद्यापीठ (एआरयू) आणि ऑस्ट्रियातील कार्ल लँडस्टेनर आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे भूक आणि संताप यांच्यामधील संबंध शोधण्यासाठी करण्यात आलेल्या नव्या संशोधनाचे निष्कर्ष ‘प्लोस वन’ या विज्ञानपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले.
-
त्यानुसार भुकेचा रागाच्या चढत्या पाऱ्याशी तर निश्चित संबंध असतोच, शिवाय भुकेमुळे सुखसंवेदनांचा स्तरही घटतो.
-
या अभ्यासांतर्गत ६४ प्रौढ व्यक्तींवर २१ दिवस प्रयोग करण्यात आला.
-
त्यांच्या भुकेचा स्तर आणि भावनिक स्तर ठरावीक ‘अॅप’द्वारे मोजण्यात आला.
-
त्याच्या निष्कर्षांनुसार भूक असताना सहभागींनी नोंदवलेल्या चिडचिडेपणात ३७ टक्के, रागात ३४ टक्के आणि आनंदातील ३८ टक्के चढउतार नोंदवण्यात आला.
-
संशोधनात असेही आढळले, की नकारात्मक भावना – चिडचिड, राग आणि असमाधान यात भुकेतील दैनंदिन चढ-उतारांमुळे बदल होतात.
-
या अहवालाचे प्रमुख लेखक ‘एआरयू’चे सामाजिक मानसशास्त्राचे प्राध्यापक वीरेन स्वामी यांनी सांगितले, की भुकेले असताना आपल्या भावभावनांवर परिणाम होतात.
-
जरी आमचा अभ्यास भुकेने निर्माण होणारी नकारात्मक भावना घटवण्याचे उपाय सुचवत नसला, तरी भावभावनांच्या चढउतारामागील कारण नेमके समजून तिचे नियमन करण्यास मदत मिळू शकते, असंही ते म्हणाले.
-
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा दोन जेवणांत बरेच अंतर असते, तेव्हा शरीरातील रक्तशर्करेची पातळी घटते.
-
दोन वेळेच्या जेवणामध्ये जास्त वेळ असेल तर शरीरातील रक्तशर्करा कमी होऊन तणाव वाढवणारी संप्रेरके (कॉर्टिसोल हार्मोन) आणि ‘अँड्रेनालाईन’सारख्या आक्रमकतेस पूरक संप्रेरकांचे प्रमाण वाढते.
-
त्यांचे रक्तातील प्रमाण वाढले, की राग, चिडचिड आणि आक्रमकता वाढते. काही व्यक्ती ‘कोर्टिसोल हार्मोन’नेही आक्रमक होतात.
-
भुकेले असताना आपल्या मेंदूच्या गतिविधीस कमी ऊर्जा मिळते. त्यामुळे स्वनियंत्रण सुटण्याची शक्यता असते.
-
भुकेशी संबंधित नकारात्मक भावना काही उपायांनी घटवता येतात, असे तज्ज्ञ सांगतात. भुकेशी संबंधित नकारात्मक भावना कमी करण्यासाठी पाच महत्त्वाच्या गोष्टी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात
-
१) रोज भरपेट नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण पोषक आहारयुक्त घटकांनी करा. गरजेनुसार मधल्या वेळी खा.
-
२) प्रक्रियायुक्त अन्न, ‘जंक फूड’ टाळा. तंतुयुक्त, पोषक, पौष्टिक व भरपूर वेळ भूक भागवणारे अन्नसेवन करा.
-
३) सोबत पोषक ‘स्नॅक’ ठेवा. आपण घरापासून दूर असताना आपल्याला भुकेले वाटल्यास हे सोबत ठेवलेले ‘स्नॅक’ मन:शांती प्रदान करते.
-
४) नियमित व्यायाम करा.
-
५) पुरेशी विश्रांती घ्या.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक