-
देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला आणि शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली पार हादरुन गेली. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला. लाल किल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावणाऱ्या अनेकांपैकी दीप सिद्धू हे एक नाव समोर आलं.
-
त्यानंतर दीप सिद्धू याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुरुदासपुरचे भाजपा खासदार सनी देओल यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरूवात झाली.
-
दिप सिद्धूबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात येत आहेत. सिद्धू संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित असल्याचं सुरूवातीला काहींनी म्हटलं. पण नंतर संयुक्त किसान मोर्चाने सिद्धूशी संबंध नसल्याचं सांगितलं.
-
तर, बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल यांचा दीप सिद्धूसोबत जवळचा संबंध असल्याचा दावा अनेकांनी केला आणि दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले .
-
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांच्या प्रचाराचं काम दीप सिद्धूने केलं होतं. त्यावेळचे दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि सनी देओल यांच्यासोबतचे फोटो शेअर करुन सिद्धू याचे भाजपाच्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय.
-
वरीष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही हे फोटो ट्विट करुन भाजपावर आरोप केले.
-
त्यानंतर आता अखेर खासदार सनी देओल यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. “आज लाल किल्ल्यावर जे झालं, ते पाहून मन खूप दुःखी झालं आहे. मी आधीही 6 डिसेंबरला फेसबुकवरुन स्पष्ट केलं आहे की माझा किंवा माझ्या परिवाराचा दीप सिद्धूसोबत कोणताही संबंध नाही. जय हिंद.” असं ट्विट सनी देओल यांनी केलं.
-
गेल्या वर्षी सहा डिसेंबर रोजी सनी देओल यांनी, "दीप सिद्धू, जो निवडणुकांच्या वेळी माझ्यासोबत होता, दीर्घ काळापासून माझ्यासोबत नाहीये. तो जे करतोय, ते स्वतः करतोय, स्वतःच्या इच्छेनुसार करतोय. त्याच्या कुठल्याही कृत्याशी माझा संबंध नाही", असं स्पष्टीकरण दिलं होतं.
-
दरम्यान, सनी देओलने दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सनी देओल यांच्यासोबतचे दीप सिद्धूचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत असून सिद्धू याचे भाजपाच्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून व काही नेटकऱ्यांकडून केला जात आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार )
-
(सर्व फोटो ट्विटरवरुन साभार )

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या