-
पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा आज (१९ जानेवारी २०२२ रोजी) दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास सापडला.
-
मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर स्वर्णवला शोधण्यासंदर्भातील पोस्ट व्हायरल होत होत्या.
-
पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी म्हणजेच ११ जानेवारी रोजी अपहरण झालं होतं.
-
त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी स्वर्णवचा सर्वत्र शोध घेत होते.
-
तपास सुरु असतानाच अचानक स्वर्णव सापडला.
-
मात्र त्याचं अपहरण कोणी?, कशासाठी केलं होतं याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
-
लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीवर त्याच्या वडिलांचा नंबर होता.
-
तेथील वॉचमन दादाराव जाधव यांच्याकडे हा मुलगा सोडून ती व्यक्ती पसार झाल्यानंतर याच इमारतीमध्ये लिफ्टचं काम करणाऱ्यांनी या बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली.
-
त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले.
-
माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीसही दाखल झाले.
-
“तो माणूस माझ्यासमोरुन पार्किंगमध्ये गेला. तिथून पुन्हा माझ्याकडे आला, थांबला. त्याने मला विचारलं जेवण झालं का? मी जेवणं झालं असंही त्याला सांगितलं,” अशी माहिती स्वर्णवला इमारतीमध्ये सोडणाऱ्या त्या व्यक्तीला पाहणाऱ्या वॉचमन दादाराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
-
“मुलाला खुर्चीवर बसवलं आणि मला म्हणाला याचा दहा मिनिटं संभाळा मी आलोच. तो निघून गेला आणि नंतर आलाच नाही. मला त्याने कपडे कोणती घातली होती. त्याचा चेहरा कसा होता हे काहीच आठवत नाही. त्याचे फक्त डोळे दिसत होते. तोंडावर काहीतरी वेगळ्या प्रकारचा मास्क होता,” असं स्वर्णवला सोडणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना जाधव यांनी सांगितलं.
-
“ही व्यक्ती गाडीवर आलेली नव्हती. मग बराच वेळ तो आला नाही तेव्हा मी लिफ्टच्या काम करणाऱ्या कामगारांना त्याबद्दल सांगितलं,” असंही जाधव म्हणाले.
-
“या बाबांपाशी (वॉचमनजवळ) तो व्यक्ती मुलाला सोडून गेला. मी दहा मिनिटांमध्ये आलो सांगून तो निघून गेला. बराच वेळ तो माणूस आला नाही. तो मुलगा रडू लागला. बाबांनी आम्हाला येऊन सांगितलं. आम्ही बाहेर येऊन थोडा वेळ वाट पाहिली पण तो माणूस काही आला नाही. अखेर आम्ही त्या मुलाची बॅग तपासली तर बॅगेत एक नंबर सापडला. त्यावर फोन केला तर तो डॉक्टरांना लागला. त्यांनी व्हिडीओ कॉल करण्यास सांगितलं असता मी व्हिडीओ कॉल करुन त्यांना त्यांचा मुलगा दाखवला व्हिडीओ कॉलवर,” असं लिफ्टचं काम करणाऱ्यांनी सांगितलं.
-
“फोन सुरुच ठेवा मी आलोच, असं डॉक्टर व्हिडीओ कॉलवर म्हणाले. त्यांनी नक्की लोकेशन कुठे आहे असं विचारलं असता आम्ही पुनावळेमध्ये पाण्याच्या टाक्या आहेत तिथे समोरच इमारत आहे, असं लोकेशन सांगितलं. त्यानंतर त्यांनी लाइव्ह लोकेशन मागितलं. आम्ही त्यांना फोनवरुन लोकेश पाठवलं. नंतर लगेच डीएसपी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचे फोन आले त्यांनीही लोकेशन मागवलं. आम्ही त्यांनाही लोकेशन पाठवलं. त्यानंतर १० ते १५ मिनिटांमध्ये त्या मुलाचे वडील आले, पोलीसही आले. नंतर अर्ध्या तासाने त्याची आई आली,” असं या मुलाला त्याच्या पालाकांच्या स्वाधीन करण्यासाठी वॉचमनला मदत करणाऱ्या लिफ्ट काम करणाऱ्यांनी सांगितलं.
-
पोलिसांना मात्र तपास अद्याप सुरु असून अपहरण कोणी?, कशासाठी केलं होतं याबद्दलची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे.

माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…