-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचं राजधानी दिल्लीत उद्घाटन केलं. प्रगती मैदानमध्ये हा महोत्सव भरला असून २७ आणि २८ तारखेला विविध प्रकारचे ड्रोन या महोत्सवात ठेवण्यात आले होते.
-
प्रगती मैदानवर भरवण्यात आलेल्या या महोत्सवात असंख्य प्रकारचे अत्याधुनिक ड्रोन ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि ग्राम विकास मंत्री गिरिराज सिंह हे उपस्थित होते.
-
यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हातात रिमोट घेऊन एक ड्रोन उडवून पाहिला. यावेळी फोटोमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया आणि व्ही. के. सिंह देखीव त्यांच्यासोबत दिसत आहेत.
-
केंद्रीय पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांनीही भारत ड्रोन महोत्सवामध्ये मोठ्या आकाराच्या ड्रोन विमानात बसण्याचा अनुभव घेतला. “आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना माझं स्वप्न आहे की प्रत्येक भारतीयाच्या हातात स्मार्टफोन असावा, प्रत्येक शेतावर ड्रोन असावेत आणि प्रत्येक घरात समृद्धी नांदावी”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
-
यावेळी ड्रोन पाहाताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “ड्रोन तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणं हे सुशासन आणि लोकांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेनं आपलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. ड्रोनच्या रुपात आपल्याकडे असं साधन आहे जे भविष्यात लोकांच्या आयुष्याचा एक भाग होऊ शकतं.”
-
शेती, क्रीडा, संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन सारख्या क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढेल, असंही मोदी यावेळी म्हणाले.
-
कुंभ मेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमांसाठी ड्रोन्सची फार मोठी मदत मिळू शकेल. तसेच, ट्रॅफिक जामसारख्या समस्यांवर ड्रोनच्या मदतीने उपाय शोधता येऊ शकतील, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी नमूद केलं. (सर्व फोटो पीटीआय)

