-
विमान अपघात तपास ब्युरोने १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा तपास अहवाल प्रसिद्ध केला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमधील संवाद आणि तांत्रिक घटनांचा तपशील दिला आहे.
-
विमानाने उड्डाण घेताच अवघ्या काही सेकंदात विमानाच्या इंजिनाला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन मोडवरून कटऑफ मोडवर गेले होते. ज्यामुळे हवेत असतानाच विमानाचे इंजिन बंद झाले.
-
कॉकपिटमधील व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एका पायलटने विचारले की, तू स्विच बंद का केलास? त्यावर दुसरा पायलट म्हणतो की, मी काहीही केले नाही. यावरून कॉकपिटमध्ये काहीतरी विसंवाद झाला असावा किंवा तांत्रिक गफलत झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
-
अहमदाबाद विमानतळाहून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ३० सेकंदात एअर इंडियाचे विमान मेघानी नगरमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. ज्यात २६० लोकांना प्राण गमवावे लागले.
-
उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा कमाल वेग १८० नॉट्सपर्यंत पोहोचला होता. मात्र इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे विमानाचा वेग आणि उंचीमध्ये झपाट्याने घट झाली.
-
एएआयबीच्या अहवालातील निष्कर्षानुसार, इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विच पुन्हा चालू केल्यानंतर एक इंजिन सुस्थितीत आले. मात्र दुसऱ्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे विमानाला पुन्हा अपेक्षित उंची गाठता आली नाही.
-
तपास अहवालात, विमानाच्या समोर पक्ष्यांची कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. त्यामुळे पक्ष्याची धडक लागून अपघात झाल्याची शक्यता फेटाळून लावण्यात आली आहे.
-
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर होते, दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता.
-
अहवालात पुढे नमूद केले की, काही सेकंद इंधन कटऑफची स्थिती राहिल्यानंतर ती बदलून पूर्ववत करण्यात आली. मात्र तोपर्यंत विमानाची उंची घटल्यामुळे सुरक्षित पातळी गाठण्यासाठी वेळ मिळाला नाही. टेकऑफ आणि क्रॅश दरम्यान सुमारे ३० सेकंद विमान हवेत होते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

AAIB Report on Air India Plane Crash: ‘उड्डाण घेताच काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद’, एअर इंडिया विमान अपघाताचं कारण आलं समोर