-
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
खडतर काळात भारतीय संघाचं नेतृत्व हाती आलेल्या सौरव गांगुलीने आपला आक्रमक स्वभाव आणि खेळाच्या जोरावर भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलून टाकला.
-
९० च्या दशकातील क्रिकेट चाहत्यांसाठी गांगुली हा भारताचा पहिला यशस्वी कर्णधार होता. त्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण संघावर आपली पकड बसवली होती. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक आक्रमक संघ म्हणून ओळख निर्माण झाली.
-
-
कर्णधार असताना सौरव गांगुली आपल्या अतरंगी निर्णयांसाठी ओळखला जायचा. आज आपण गांगुलीच्या अशाच ३ निर्णयांबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामुळे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून गेला.
-
१) राहुल द्रविडला यष्टीरक्षणाची संधी – भारतीय संघात चांगल्या अष्टपैलू खेळाडूची कमतरता पाहून गांगुलीने संघात एका अतिरीक्त फलंदाजाला जागा देण्याचं ठरवलं. यासाठी प्रयोग म्हणून सौरवने राहुल द्रविडला यष्टीरक्षण करायला सांगितलं. द्रविड भारताचा यष्टीरक्षक झाल्यानंतर संघात फलंदाजासाठी एक जागा निर्माण झाली आणि यानंतर २००३ विश्वचषकादरम्यान भारतीय संघाची कामगिरी आपण सर्वांनीच अनुभवली आहे. याआधीही भारताने २००२ चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, ज्यात भारत आणि श्रीलंका हे संयुक्त विजेते होते.
-
२) सेहवागला कसोटीत सलामीला पाठवण्याचा निर्णय – आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या विरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण करताना मधल्या फळीत खेळून शतक झळकावलं होतं. सेहवागचा आक्रमक खेळ पाहून गांगुलीने त्याला कसोटीत सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला, गांगुलीचा हा निर्णयही चांगलाच यशस्वी ठरला. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून केलेली फलंदाजी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. (छाया – रवी कनोजिया, इंडियन एक्सप्रेस)
-
३) इडन गार्डन्समध्ये सचिनकडून गोलंदाजी करवून घेण्याचा निर्णय – ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती. द्रविड आणि लक्ष्मणने केलेल्या भागीदारीमुळे भारताला अशी कामगिरी करणं शक्य झालं. मात्र सामन्यात अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चिवट खेळ करत सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकवला. यावेळी सौरवने सचिनच्या हाती चेंडू सोपवला. सचिननेही गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन आणि शेन वॉर्न यांना माघारी धाडत दादाचा निर्णय योग्य ठरवला.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल