-
पुण्याचं सगळंच हटके असतं, असं नेहमी म्हटलं जातं. पुणेरी पाट्या हा देखील तितकाच चर्चेचा विषय असतो.
-
याच पाट्यांचा वापर करून एका पुणेकरानं चक्क त्याच्या दुचाकीचं स्मारक उभारलं आहे.
-
चूक नसताना देखील आपली बाईक वाहतूक विभागानं उचलून नेली, याचा निषेध करण्यासाठी त्यानं ही शक्कल लढवली.
-
गणेशोत्सवाचं निमित्त साधून पुण्याच्या कोथरूडमझील सचिन धनकुडे यांनी चक्क त्यांच्या बाईकचंच स्मारक देखावा म्हणून उभं केलं.
-
१५ जूनला सचिन धनकुडे यांची बाईक वाहतूक विभागाच्या गाडीनं उचलून नेली होती. पण गाडी नो पार्किंगमध्ये नसल्याचा सचिन धनकुडे यांचा दावा आहे.
-
आपली चूक नसतानाही गाडी उचलून नेल्याचं लक्षात येताच सचिन धनकुडे यांनी वाहतूक विभागाच्या कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
-
वाहतूक पोलिसांनी त्यांच्या तक्रारी किंवा आक्षेपांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही.
-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोथरूडमधल्या भुसारी कॉलनी गणेश मंडळामध्ये गाडीचं स्मारक हा देखावाच उभा केला.
-
यामध्ये स्मारकाच्या सगळ्यात वरच्या बाजूला त्यांनी दुचाकी ठेवली आहे.
-
स्मारकाच्याच एका बाजूला गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
-
स्मारकावर अनेक पाट्या लावल्या असून त्यावर तिरकस पद्धतीने वेगवेगळे संदेश लिहिण्यात आले आहेत.
-
यामध्ये वाहतुकीच्या अनेक समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
-
त्यासोबतच जनजागृती करण्यासाठी देखील काही मुद्दे नमूद केले आहेत.
-
माँ ने कहा शराब छोड दो, बाबुजीने कहा घर छोड दो, पीछे बैठी पारू कह रही है सिग्नल तोड दो! अशा स्टाईलमध्ये एक पाटी लिहिली आहे.
-
तर एका पाटीवर पोलीस कर्मचाऱ्यांना पावत्या करण्याचं टार्गेट देणं बंद करा असं आवाहन करण्यात आलं आहे.
-
एका पाटीवर तर चक्क लाल रंग बघून बैल उधळतात, त्यामुळे लाल सिग्नल बघितल्यावर काय करायचं, ते तुमचं तुम्ही ठरवा अशा शब्दांत सिग्नल तोडणाऱ्यांना चांगलंच बोधामृत देण्यात आलं आहे.
-
सचिन धनकुडे यांच्या या गाडीच्या स्मारकाची कोथरूड परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
सचिन धनकुडे यांच्या या ‘गाडीचं स्मारक निषेधा’नंतर पोलिसांन तब्बल ८० दिवसांनी त्यांची गाडी परत केली आहे.
-
दरम्यान, आपण कोणतीही चूक केली नसल्यामुळे पोलिसांनी कसलाही दंड न घेताच आपली दुचाकी परत केल्याचं त्यांनी सांगितलं.
-
या देखाव्यातून पुणे शहरातील पार्किंग आणि फुटपाथचं ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त