-
गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेत १३३ जणांनी प्राण गमावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या भीषण घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.(फोटो सौजन्य-रॉयटर्स)
-
या पूल दुर्घटनेत एका युवकाची सहा वर्षीय बहिण बेपत्ता आहे. तिच्या काळजीनं या युवकानं टाहो फोडला. माझी बहीण मला परत द्या, असं म्हणत हा तरुण ओक्साबोक्सी रडला.
-
माझी बहीण पुलाच्या मध्यभागी फोटो काढत होती. यावेळी पुलावर किमान ८०० लोक उपस्थित होते, अशी माहिती या युवकानं दिली आहे.(फोटो सौजन्य- पीटीआय)
-
“मी या ठिकाणी दर रविवारी चहा विकतो. या दुर्घटनेनंतर पुलाच्या केबलवर काही जण लटकत होते आणि त्यानंतर ते पाण्यात पडले. हे दृश्य पाहिल्यानंतर मी रात्रभर झोपलो नाही”, अशी आपबीती मोरबी पूल परिसरातील चहा विक्रेत्यानं सांगितली आहे.(फोटो सौजन्य-एएनआय)
-
“संपूर्ण रात्रभर मी पीडितांची मदत केली. सात ते आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला डोळ्यांसमोर मरताना पाहून मन हेलावून गेलं. माझ्या आयुष्यात मी अशाप्रकारची घटना कधीही पाहिली नव्हती”, अशी प्रतिक्रिया घटनेनंतर चहा विक्रेत्यानं दिली आहे.
-
या पूल दूर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आलं होतं.(फोटो सौजन्य- पीटीआय)
-
पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला. गर्दीमुळे आणि काही तरुणांच्या कृत्यामुळे या पुलाला धोका असल्याची त्यांची भीती अखेर खरी ठरली.(फोटो सौजन्य-एक्स्प्रेस)
-
या दुर्घटनेनंतर लष्कर, वायू दल, नौदलासह एनडीआरएफकडून मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य राबवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडूनही नदीपात्रात शोधमोहीम सुरू आहे.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
मोरबी नगरपालिकेच्या ‘फिटनेस’ प्रमाणपत्राशिवाय हा पूल खुला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाची दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचे कंत्राट ‘ओरेवा’ समुहाला १५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले होते.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
या घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
-
या दुर्घटनेतून बचावलेले मेहुल रावल यांनी या पुलावर ३०० लोक जमले होते, अशी माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(फोटो सौजन्य-एएनआय)
IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: तिलक वर्माचं अर्धशतक पूर्ण! टीम इंडियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज