-
चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत.
-
मागील दोन महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच जगभरातील प्रसार माध्यमांनी जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यासंदर्भातील वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्यानंतर जॅक मा हे कुठे आहेत यासंदर्भातील पुसटशी कल्पना चिनी प्रसारमाध्यमांनी दिलीय.
-
चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची धोरणं आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या धोरणांवर जॅक मा यांनी टीका केली होती. त्यामुळे जिनपिंग हे जॅक मा यांच्यावर नाराज असल्याचे समजते.
-
चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या पीपल्स डेलीने जॅक मा यांना सरकारी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे संकेत दिले आहेत.
-
जॅक मा यांनी चीन सोडून इतर देशामध्ये पलायन करु नये म्हणून त्यांना एका गुप्त ठिकाणी सरकारी नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
-
चिनी प्रसार माध्यमांमधील वृत्तांनुसार कम्युनिस्ट पक्षाने जॅक मा यांना देश सोडून न जाण्याचा सल्लाही दिला आहे.
-
जॅक मा यांच्या चीन सरकारची अवकृपा होण्यामागे जॅक मा आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी असणारा वाद आणि अलिबाबा समुहाच्या मालकीची अली पेसंदर्भातील विवाद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
-
अली पे या कंपनीची स्थापना जॅक मा यांनी २० वर्षांपूर्वी केली होती. अली पे हा जगातील सर्वात मोठा मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. ७३ कोटी युझर्स या सेवेचा वापर करतात.
-
जॅक मा हे हुशार आहेत मात्र राष्ट्रीय धोरणांचे समर्थन केलं नाही तर त्यांची कंपनी ट्रिलियन डॉलर्सचा उद्योग उभा करु शकणार नाही. सध्या जॅक मा हे चीनमधील प्रभावशाली नेतृत्व नाहीय तसेच त्यांची लोकप्रियताही आधी इतकी राहिलेली नाही, असं पिपल्स डेली ने म्हटलं आहे.
-
आलिबाबाचे संस्थापक असणारे जॅक मा हे त्यांच्या स्वत:च्या टॅलेंट शोच्या म्हणजेच आफ्रिकाज् बिझनेस हिरोज या कार्यक्रमाच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.
-
जॅक मा हे या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीसाठी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र अगदी शेवट्या क्षणी जॅक यांच्या जागी अलिबाबा कंपनीच्या अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कर्यक्रमाला उपस्थिती लावली. हा सर्व प्रकार नोव्हेंबर महिन्यामध्ये घडल्याचे युनायटेड किंग्डममधील टेलीग्राफने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीचे संस्थापक असणाऱ्या जॅक मा यांचा फोटोही वेबसाईटवरुन काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आलं आहे. पोस्टरवरुनही जॅक मा यांचे फोटो हटवण्यात आलेत. नोव्हेंबर महिन्यामधील या कर्यक्रमाला जॅक मा हे अनुपस्थित राहिल्यासंदर्भात नंतर त्यांच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सारवासारव करणारी उत्तरं दिली.
-
जॅक मा यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये अडचणी येत असल्याने ते या शोच्या अंतिम फेरीसाठी उपस्थित राहू शकले नाही असं सांगण्यात आल्याचं वृत्त फायनॅनशियल टाइम्सने दिलं होतं.
-
जॅक मा यांच्या अॅण्ट समुहासंदर्भात (एएनटी ग्रुप) ऑक्टोबर महिन्यापासून एक नवीन वाद सुरु झाल्याचे वृत्त आहे. जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी चीनमधील सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती.
-
शांघायमधील आपल्या एका भाषणामध्ये जॅक मा यांनी देशात संशोधनाला वाव मिळत नाही असं मत व्यक्त करण्याबरोबरच जागतिक बँकींगसंदर्भात बोलताना चीन अजूनही जुन्या लोकांचा क्लब असल्यासारखे वाटते असं मत व्यक्त केलं होतं.
-
“आजची आर्थिक व्यवस्था ही औद्योगिकरणामुळे निर्माण झालेली आहे. आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण ेकली पाहिजे. आपण आपली सध्याची आर्थिक व्यवस्था बदलण्याची आवश्यकता आहे,” असं परखड मत जॅक मा यांनी व्यक्त केलं होतं.
-
जॅक मा यांनी शेवटचं ट्विटही १० ऑक्टोबर २०१९ रोजी केलं आहे.
-
जॅक मा यांच्या या वक्तव्यानंतर अॅण्टच्या आयपीओला चीनमधील सरकारी यंत्रणांनी दिलेली परवानगी नाकारण्यात आली. या आयपीओची किंमत ३७ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती.
-
शांघाय स्टॉक एक्सचेंजने अॅण्ट समुहासंदर्भात काही तक्रारी समोर आल्या असून आर्थिक तंत्रज्ञान नियमकामध्ये बदल करण्यासंदर्भातील तक्रार समोर आल्याचं सांगत कंपनीच्या आयपीओला विरोध केला होता.
-
अमेरिकन गुंतवणूकदार मार्क मोबीयस यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार वित्तीय संस्था मोठ्या होण्यापासून रोखण्यासाठी जॅक मा यांच्या अॅण्ट समुहाची अडवणूक करण्यात आली.
-
“मला वाटतं चीनमधील सरकारला या कंपन्यांवर देखरेख ठेवण्याची गरज भविष्यात निर्माण होईल असं वाटलं असावं. त्यामुळेच जॅक मा यांच्या अॅण्टसारख्या या कंपन्या मोठ्या होऊ नयेत म्हणून हे प्रयत्न करण्यात आल्याचा दावा मोबीयस यांनी केलाय.
-
"एखादी विशिष्ट कंपनी एखाद्या क्षेत्रात मत्तेदारी निर्माण करण्याएवढी मोठी व्हावी असं चिनी सरकारचं धोरण दिसत नाही. अशा कंपन्यांना विरोध करण्यासाठीच या प्रकरणात चीन सरकारने लक्ष घातलं. खास करुन आर्थिक क्षेत्रातील कंपन्या मोठ्या होणं चीन सरकारला मान्य नसल्याचं दिसत आहे,” असं मोबीयस यांनी जॅक मा यांच्यासंदर्भात घडलेल्या प्रकाराच्यासंदर्भात सीएनबीसीशी बोलताना म्हटलं आहे.
-
चीन सरकारच्या हाती असणाऱ्या यंत्रणांनी अलिबाबा कंपनीविरोधात मत्तेदारी स्थापन करण्यासंदर्भातील चौकशी सुरु केली आहे.
-
डिसेंबर महिन्यामध्ये ही चौकशी सुरु झाली आणि त्यानंतर जॅक मा यांच्या मालकीच्या अॅण्ट कंपनीला कामाची रचना बदलण्यासंदर्भातील सूचना सरकारी यंत्रणांनी केल्या.
-
अॅण्टचा आयपीओ रद्द झाल्याने पैशाची फारशी आवड नसणारे जॅक मा हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता होता राहिले असा टोलाही पिपल्स डेलीने आपल्या लेखातून लगावला आहे.
-
अॅण्ट समूह हा जगातील सर्वात मोठी फायनॅनशियल टेक्नोलॉजी कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात अलीबाबा समुहाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या टाओबाओच्या या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील आर्थिक देवाणघेवाणीसाठी करण्यात आलेली.
-
अॅण्ट समूहच्या मत्तेदारीसंदर्भातील तपासाला चीनमध्ये वेग आला आहे. चीनमधील नियमाकांनी रविवारी जारी केलेल्या पत्रकामध्ये चीनमधील केंद्रीय बँक असणाऱ्या पिपल्स बँक ऑफ चायनाने अॅण्ट समूहच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी नोटीस पाठवली आहे. कंपनीने रेक्टीफिकेशन प्लॅनसोबतच क्रेडिट, विमा आणि संपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील सेवांच्या उद्योगासंदर्भातील वेळापत्रकही तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
जॅक मा यांच्यासाठी २०२० चा शेवट अगदीच धक्कादायक ठरला. अलीबाबाच्या सहसंस्थापकांना ऑक्टोबरपासून वर्ष संपेपर्यंत एकूण ११ अरब कोटी रुपयांचा फटका बसला. भारतीय मुल्यानुसार ही रक्कम ८० हजार कोटींहून अधिक आहे. सरकारी यंत्रणांनी कंपनीवर वाढवलेली देखरेख आणि इतर कंपन्यांच्या कामगिरीमुळे हा फटका बसला.
-
अलीबाबा ही सध्या चीनमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एख आहे. या वर्षी जॅक मा यांची संपत्ती अंदाजे ६१.७ अब्ज डॉलर पर्यंत पोहचली. त्यावेळी ते पुन्हा चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापासून खूपच जवळ होते.
-
मात्र ब्लूमबर्ग इंडेक्सने दिलेल्या वृत्तानुसार जॅक मा यांची नेट वर्थ म्हणजेच एकूण संपत्ती कमी झाली आणि ती ५०.९ अब्ज डॉलर्सपर्यंत आली. त्यामुळे ते श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानी घसरले.
-
अॅण्ट समूहचा आयपीओला परवानगी नाकरल्याने जॅक मा यांच्या लोकप्रियतेला मोठा फटका बसल्याचे पिपल्स डेलीने म्हटलं आहे.
-
एशिया टाइम्सच्या वृत्तानुसार केवळ जॅक मा यांनाच नाही तर चीनमधील आणखीन एक लोकप्रिय उद्योजकांलाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. चीनमधील अब्जाधीश उद्योगपती लियू किआंगडोंग मागील बऱ्याच काळापासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून आलेले नाही. त्यामुळे त्यांनाही नजरकैदेत ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
-
लियू किआंगडोंग चीनमधील जेडी डॉट कॉम या कंपनीचे नेतृत्व करतात. कंपनीने आतापर्यंत दोनवेळा माफी मागितली आहे. जॅक मा यांच्यासोबतचे संबंध तोडण्यासाठी कंपनीने आपल्या कामकाजातही बदल केला आहे.
-
जॅक मा यांनी मध्यंतरी करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, युरोप आणि जागतिक आरोग्य संघटनेला कोट्यावधी फेस मास्क मदत म्हणून पाठवले होते.
-
जॅक मा हे त्यांच्या समाजसेवेसाठीही ओळखले जातात.
-
जॅक मा फाऊण्डेशन हे शिक्षण, व्यवसाय, महिला नेतृत्व आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करतं.
-
फोर्ब्सच्या अहवालानुसार ३०० मिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक मदत करण्याचं उद्देश जॅक मा यांच्या सेवाभावी संस्थेनं समोर ठेवलं आहे. (फोटो : एपी, एएफपी, रॉयटर्स, विकिपिडिया आणि ट्विटरवरुन साभार)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…