-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये संवाद साधताना एका मजुराचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. हा मजूर म्हणजे ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील इसक मुंडा. पण इसक मुंडा यांनी असं काय केलं आहे की, थेट मोदींनाच त्यांची दखल घ्यावी लागली. (Photos: Instagram/Twitter/Youtube)
-
एकेकाळी मजूर म्हणून काम करणारे इसक मुंडा आज युट्यूबर म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. नरेंद्र मोदींनी इसक मुंडा युट्यूबच्या माध्यमातून चांगली कमाई करत असल्याचं मन की बातमध्ये सांगितलं.
-
इसक मुंडा आपल्या व्हिडीओत स्थानिक गोष्टी, जेवण, गाव, राहणीमान, कुटुंब अशा अनेक गोष्टी दाखवतात. त्यांच्या व्हिडीओंमधून शहरी लोकांना गावाकडच्या अनेक गोष्टी पाहण्यास मिळतात असं सांगत मोदींनी त्यांचं कौतुक केलं. इसक मुंडा आपल्या सर्वांसाठी प्रेरणा असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
-
दरम्यान मोदींनी कौतुक केल्यानंतर इसक मुंडा यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. "पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये माझं नाव घेतलं. यामुळे मला आनंद झाला आहे. माझं चांगलं काम मी सुरु ठेवेन," अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान यानिमित्ताने आपण इसक मुंडा यांचा मजूर ते युट्यूबर हा प्रवास जाणून घेऊयात.
-
लॉकडाउनमुळे अनेकांना आपल्या मजुरांना आपल्या हातचा रोजगार गमवावा लागला. यानंतर अनेकांनी आपलं घर गाठलं. यावेळी काहीजण निराश झाले तर काहींनी जगण्यासाठी नवे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. ओडिशामधील इसक मुंडा यांनी अशाच पद्धतीने कुटुंबाचं पोट भरण्यासाठी एक नवा मार्ग अवलंबून पाहिला आणि आज ते महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत.
-
इसक मुंडा यांचे युट्यूबवर जवळपास साडे सात लाख फॉलोअर्स आहेत.
-
Isak Munda Eating असं या युट्यूब चॅनेलचं नाव आहे.
-
लॉकडाउनमुळे इसक मुंडा यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. साठवलेले सगळे पैसे संपल्यानंतर त्यांनी कधी स्वप्नातही आपण अशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो असा विचार केला असेल.
-
युट्यूबर होण्याआधी इसक मुंडा यांच्यासमोर संकटांचा डोंगर होता.
-
पत्नी, दोन मुली आणि मुलासहित एका झोपडीत ते राहत होते.
-
३५ वर्षीय इसक मुंडा सातवीपर्यंत शिकले आहेत.
-
करोनाचा फैलाव सुरु होण्याआधी ते एका बांधकामाच्या ठिकाणी नोकरी करत होते. पण लॉकडाउन लागला आणि त्यांच्या हातची मजुरी गेली.
-
हातात काही काम नसल्याने त्यांना साठवलेला पैसाही खर्च करावा लागला.
-
कुटुंबाला दोन वेळचं अन्न देण्यासही झगडावं लागत असताना इसक मुंडा चिंतेत होते. यावेळी त्यांच्या काही मित्रांनी युट्यूब चॅनेल सुरु करण्याचा सल्ला दिला.
-
यानंतर इसक मुंडा यांनी आपल्या काही मित्रांकडून पैसे उधार घेतले आणि आपल्याकडील तीन हजार रुपये टाकून एक स्मार्टफोन विकत घेतला.
-
यानंतर त्यांना आपल्या दैनंदिन गोष्टी युट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली.
-
सर्वात प्रथम इसक मुंडा यांनी भात आणि करी खातानाचा एक व्हिडीओ अपलोड केला होता.
-
त्यांच्या या व्हिडीओला पाच लाख व्ह्यू आहेत.
-
इसक मुंडा यांच्या व्हिडीओंना ग्रामीण भागाचा स्पर्श असल्याने अनेकांना ते आवडू लागले.
-
"मी माझ्या गरीब घरात आणि गावात हे व्हिडीओ तयार करतो. आम्ही काय आणि कसं खातो हे लोकांना दाखवतो. माझे व्हिडीओ लोकांना आवडत आहेत याचा आनंद आहे. मला आता यामधून चांगले पैसे मिळत आहेत," असं इसक मुंडा सांगतात.
-
पहिला व्हिडीओ पोस्ट केल्याच्या तीन महिन्यांनी इसक मुंडा यांच्या बँक खात्यात ३७ हजार रुपये आले. यानंतर अजून तीन महिन्यांनी पाच लाख रुपये आले.
-
यानंतर इसक मुंडा यांच्या युट्यूब चॅनेलचे सबस्क्रायबर्स वाढत गेले. इतर काही युट्यूबर्सनेही त्यांना पाठिंबा दिला.
-
इसक मुंडा आपल्या व्हिडीओंमधून जेवणासोबतच गावातील इतर गोष्टीही दाखवण्याचा प्रयत्न करतात.
-
त्यांनी आतापर्यंत २५० व्हिडीओ पोस्ट केले असून जवळपास साडे सात लाख सबस्क्रायबर्स आहेत.
-
इसक मुंडा यांच्या ‘Fish and Rice Eating Indian Village’ या व्हिडीओला तब्बल १२ लाख व्ह्यू मिळाले आहेत.
-
इसक यांच्या पत्नीनेही आनंद व्यक्त केला असून लोकांचे आभार मानले आहेत. "एकदा त्यांनी आम्ही राहत असलेल्या मातीच्या घऱाचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनेक लोकांनी तो पाहिला. यानंतर भुवनेश्वरमधील एका संस्थेने आम्हाला विटांचं घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली," असं त्या सांगतात.
-
"इसक सतत व्हिडीओ तयार करत असून त्याने झाडांच्या पानापासून चटई करतानाचा व्हिडीओही शूट केला होता. लोकांना यामधून आमची संस्कृती पहायला मिळते. त्यातून त्याला पैसेही मिळतात," असं इसक मुंडा यांचे सासरे सांगतात.
-
संकट आलं म्हणून हार पत्करणाऱ्या अनेकांसांठी इसक मुंडा यांनी एक उदाहरणच उभं केलं आहे.
-
इसक मुंडा हे फक्त पैशांसाठी व्हिडीओ तयार करत नसून यातून जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे. संस्कृती, परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी अशी त्यांची अपेक्षा आहे. "आता आपल्याला मजूर म्हणून काम करावं लागत नाही," याचा आनंद असल्याचंही ते सांगतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : इसक मुंडा / युट्यूब, इन्स्टाग्राम)

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी