-
Shivrajyabhishek Sohala 2025 At Raigad Fort: ढोल ताशांचा गजर, मंत्रोच्यार आणि शंखानाद, शिवरायांच्या गजरात किल्ले रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.
-
या सोहळ्यासाठी राज्यभरातील ८० हजारहून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होते.
-
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
यावेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती आणि शहाजी राजे उपस्थित होते.
-
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, कोकण विभागाचे पोलीस विशेष महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधिक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी. यावेळी उपस्थित होते.
-
दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरवात गुरुवारी दुपारी गडपुजनाने झाली.
-
रायगड खोऱ्यातील २१ गावातील नागरीकांनी एकत्र येऊन गडपुजन केले. यानंतर शिरकाई देवी मंदिरात गोंधळ तर जगदिश्वर मंदिरात किर्तन सोहळा संपन्न झाला.
-
राज्यभरातील विवीध भागातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर मर्दानी खेळ सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
-
रात्री उशीरा राजसदरेसमोर शाहिरांनी पोवाडे सादर केले.
-
शुक्रवारी सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली.
-
पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राज सदरेवर शाहिरांनी महाराजांना मानवंदना दिली.
-
सकाळी साडे दहाच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीतील मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालण्यात आले. नंतर या मुर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले.
-
शिवआरतीचे पठण करण्यात आले. यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याला सश्रस्त्र मानवंदना देण्यात आली.
-
महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. या चैतन्यमय सोहळ्या लाखो शिवभक्त नागरीक, महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
-
शंखनाद आणि तुतारीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने रायगडचा परिसर दुमदुमून गेला होता.
-
राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी पारंपारीक वेषात मैदानी खेळांची, शस्त्र कवायतीचे सादरीकरण केले.
-
पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप झाला. सोहळ्या निमित्ताने गडावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती.
-
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-
पाचाड ते रायगड पायथा या दरम्यान वाहतुक नियमन करण्यात आले होते.
-
दोन शिवभक्तांना चक्कर येऊन पडले होते. त्यांच्यावर आरोग्य पथकांनी तात्काळ उपचार केले.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल