नागपूर : शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे संख्याबळ वाढावे म्हणून खुद्द भाजप प्रयत्न करीत असून भाजपला पाठिंबा देणा-या अपक्षांना गुवाहाटीला जाण्याचा सल्ला दिला जात आहे. यात विदर्भातील अपक्षांचा समावेश आहे. राज्यातील सत्ता नाट्याला रोज नवनवे वळण मिळू लागले आहे. वरवर यासाठी सेनेतील बंडाळी कारणीभूत आहे,असे वाटत असले तरी या संपूर्ण घडामोडींना भाजपची साथ आहे हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट झाले आहे. शिंदेंचे बंड यशस्वी व्हावे यासाठी या गटाचे संख्याबळ वाढवणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपने त्यांना पाठिंबा देणा-या अपक्षांना गुवाहाटी येथे जाण्यास सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात पाच अपक्ष आमदार आहेत. त्यात देवेंद्र भुयार (मोर्शी), आशीष जयस्वाल (रामटेक), विनोद अग्रवाल (गोंदिया), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), रवी राणा (बडनेरा), किशोर जोर्गेवार यांचा समावेश आहे. यापेकी जयस्वाल, भोंडकर यांचा सेनेला, अग्रवाल, राणा यांचा भाजपला तर भुयार यांचा राष्ट्रवादीला पाठिंबा आहे. जोर्गेवार यांच्याशी खुद्द शिंदे यांनीच संपर्क साथून पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. सेनेला पाठिंबा देणारे अपक्ष गुवाहाटीतच आहे. आता भाजपला पाठिंबा देणारे अपक्षही तेथे पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपला मतदान करणा-या आमदारांनी आम्ही तुमच्या सोबत असताना गुवाहाटी येथे जाण्याचे औचित्य काय? असा सवाल भाजप नेत्यांना केला असता त्यांना शिंदे गटाचे संख्याबळ वाढवण्यासाठी जाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent mla from vidarbha who support bjp are urged to go guwahati print politics news asj