जन्मदात्या आईची मुलांनी सुमारे ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आईला माहेरच्या मिळकतीतून पैसे मिळणार असल्याची माहिती समजल्यानंतर न्यायालयीन कामकाजासाठी स्वाक्षरी आवश्यक असल्याचे सांगून मुलांनी आईच्या बँक खात्यातून ४६ लाख रुपयांची रोकड परस्पर काढली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी ज्येष्ठ महिलेच्या दोन मुलांसह, सुना तसेच नातीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- पुणे मनसेमध्ये नाराजी नाट्य जोरात; वसंत मोरेंबाबत पुणे मनसे पदाधिकारी म्हणाले “येत्या दोन दिवसात… “
याबाबत एका ८२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाळासाहेब मारूती टिळेकर, मिलिंद मारूती टिळेकर, सुनीता बाळासाहेब टिळेकर, स्वाती बाळासाहेब टिळेकर, स्वाती मिलिंद टिळेकर आणि नात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला मुंढव्यातील केशवनगर भागात एका वाड्यात एकट्याच राहण्यास आहेत. त्यांना चार मुले आहेत. ज्येष्ठ महिला या लहान मुलाकडे राहायला होत्या. तीन मुले विचारपूस करत नव्हते. दरम्यान, आईला माहेरहून पैसे मिळणार असल्याची कुणकुण मुलगा बाळासाहेब, मिलिंद आणि सुनांना लागली. त्यानंतर मुले आईशी प्रेमाने वागू लागली. मुलांकडून आईची विचारपूस करण्यात आली. मोठा मुलगा बाळासाहेब यांनी आईला घरी राहण्यास बोलावले. एप्रिल २०१२ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने आईच्या माहेरच्या मिळकतीचे ६० लाख रुपये बँक खात्यात जमा झाले. त्यावेळी मुलांनी न्यायालयाच्या बाहेर आईच्या स्वाक्षऱ्या कागदपत्रांवर घेतल्या.
हेही वाचा- पुणे : नवमतदार नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती
ज्येष्ठ महिलेला २०१५ मध्ये हदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात पैसे भरण्यासाठी त्यांनी बँकेतून अडीच लाख रुपये काढले. तेव्हा बँक खात्यातून परस्पर ४६ लाख रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. पैशांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा मुलांनी अरेरावी केली. ज्येष्ठ महिला राहत असलेल्या घराचे वीज देयक थकले होते. वीज देयक न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पाणीपट्टी न भरल्याने पाणी बंद झाले होते. आई घरातून निघून जाण्यासाठी तिला त्रास देण्यात आला.
भरोसा कक्षामुळे प्रकार उघड
ज्येष्ठ महिलेने पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षात तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा दाखल करण्यासाठी मुंढवा पोलिसांकडे सोपविण्यात आले. ज्येष्ठ महिलेच्या वतीने ॲड. स्मिता पाडोळे काम पाहत आहेत. भरोसा कक्षातील ज्येष्ठ नागरिकांच्या कक्षाने हे प्रकरण मुंढवा पोलिसांकडे अभिप्रायासाठी सोपविले होते. या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंढव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली.