मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक,माजी शहर अध्यक्ष, नगरसेवक असलेले वसंत मोरे यांनी शहरातील काही प्रमुख नेते मंडळी कार्यक्रमापासून दूर ठेवत असल्याबद्दल नाराजी याआधीच अनेक वेळा उघडपणे बोलावून दाखवली आहे.या प्रकरणाला फोडणी मिळेल अशा आणखी एका घटनेची भर नुकतीच पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्न समारंभ दरम्यान भेट झाली. त्यावेळी ‘तात्या, कधी येताय, वाट पहातोय’, अशा शब्दात अजित पवार यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिल्याची चर्चा आहे.त्यामुळे पुन्हा एकदा वसंत मोरे मनसेमध्ये थांबणार की राष्ट्रवादीमध्ये जाणार या चर्चांना सुरुवात झाली आहे.

त्याबाबत मनसेचे नेते वसंत मोरे यांच्याशी काल संवाद साधला असता ते म्हणाले की, माझ्या बाबत पक्षामध्ये ज्या काही घटना घडत आहे त्याला बाबू वागसकर हेच जबाबदार आहेत, तसेच मी आजही राज ठाकरें सोबतच आहे.

एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना आज पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात एक बैठक झाली.या बैठकीला मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीनंतर बाबू वागसकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर प्रतिक्रिया दिली आहे. ” आठवड्याभरात कोणती काम करायची त्याबाबत आजची बैठक पदाधिकाऱ्यांसोबत झाली.पुणे महापालिकेने शहरी गरीब योजना बंद केली आहे.तसेच करदात्यांना ४० टक्के सवलत मिळावी, यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती, त्यावर निर्णय झाला नाही. या दोन विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही लवकरच आंदोलन करणार आहोत “, अशी प्रतिक्रिया वागसकर यांनी दिली आहे.

हेही वाचा… वसंत मोरेंना राष्ट्रवादीच्या ‘मागणी’मुळे पुण्यातील राजकीय समीकरणांत नवी बेरीज-वजाबाकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसंत मोरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबद्द्लची चर्चा जोरात सुरु आहे, मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मुद्दावर पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचा दावा वागसकर यांनी केला आहे. ” वसंत मोरे यांच्या बाबत आजच्या बैठकीत काही चर्चा झाली नाही. येत्या दोन दिवसात सविस्तर खुलासा केला जाईल “, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.