scorecardresearch

पुणे : नवमतदार नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जिल्हा प्रशासनाकडून नवमतदार नोंदणीसाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातून जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी होऊ शकणार आहे.

पुणे : नवमतदार नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती
नवमतदार नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती (संग्रहित छायाचित्र)

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील तब्बल ४४२ महाविद्यालयांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून नवमतदार नोंदणीसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुण्यातून जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

हेही वाचा- पुणे : मनसे अंतर्गत गटबाजी उफाळली; वसंत मोरेंच्या आरोपानंतर पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

राज्यासह देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात दरवर्षी दाखल होतात. या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेशावेळी मतदार म्हणून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील ४४२ महाविद्यालयांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून नवमतदारांच्या नोंदणीसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक महाविद्यालयाने देखील त्यांच्या स्तरावर नवमतदार नोंदणीसाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंद करून घेण्यात येत आहे.

हेही वाचा- बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘सध्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर हरकती, आक्षेप स्वीकारण्याचे काम सुरू आहे. या कालावधीत नवमतदारांची जास्तीत जास्त मतदार म्हणून नोंद होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खास उपक्रम, शिबिर राबविण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या शिबिरात एका दिवसांत तब्बल ३१ हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या सुधारणांनुसार आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार आहे. याशिवाय आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपुर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांची आगाऊ नावनोंदणी देखील करता येणार आहे. यादृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जिल्हा प्रशासनाकडून नवमतदार नोंदणीसाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातून जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी होऊ शकणार आहे.’

दरम्यान, नवमतदारांह समाजातील दुर्लक्षित घटक म्हणजेच देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, पुण्यातील औद्योगिक वसाहती, कंपन्यांमध्ये कार्यरत कामगारांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. महिला बचतगटांच्या सहकार्याने महिलांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येत आहे. या सर्व मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड, हडपसरमध्ये; कसब्यात महिला मतदारांची संख्या अधिक

बुधवार पेठेत खास शिबिर

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या पुढाकाराने बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांची मतदार म्हणून नोंद करण्यासाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत १८३ महिलांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली. तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील खास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या शहरासह जिल्ह्यात ३४४ तृतीयपंथीयांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 17:00 IST

संबंधित बातम्या