पुणे : पुण्यातील नामवंत वैद्यकीय रुग्णालयात भूलतज्ज्ञ असलेला डॉ. अदनान अली सरकार हा ‘आयसिस’च्या महाराष्ट्र गटाचा (मॉडय़ुल) म्होरक्या असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सरकार हा तरुणांची माथी भडकावून त्यांना ‘आयसिस’मध्ये भरती करत असल्याचेही तपासात निदर्शनास आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी डॉ. सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्या घरातून लॅपटॉप, हार्ड डिस्क, सिमकार्ड, तसेच आयसिसशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. डॉ. सरकार तरुणांची माथी भडकावून ‘आयसिस’मध्ये भरती करत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून निष्पन्न झाली आहे. तो ‘आयसिस’च्या महाराष्ट्रातील ‘मॉडय़ुल’चा म्होरक्या असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
‘आयसिस’च्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना जाळय़ात ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता. याबाबतची माहिती ‘एनआयए’ला मिळाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे येथे कारवाई करण्यात आली. ‘एनआयए’च्या पथकाने चौघांना अटक केली होती. मुंबईतून तबिश नासेर सिद्दिकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली होती.

‘एनआयए’ कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी डॉ. अदनान अली सरकार आयसिसच्या दहशतवादी विचारधारेच्या प्रसारात सामील असल्याची माहिती मिळाली. डॉ. सरकार तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून काम करत होता.

दरम्यान, डॉ. सरकारला ‘एनआयए’च्या पथकाने मुंबईतील विशेष न्यायालयात शुक्रवारी (२८ जुलै) हजर केले. विशेष न्यायालयाने त्याला ८ ऑगस्टपर्यंत ‘एनआयए’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

भूलतज्ज्ञ ते ‘आयसिस’ प्रसारक

डॉ. अदनान अली हडपसर भागातील एका नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होता. पंधरा वर्षांपासून तो वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्याने पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ‘आयसिस’च्या दहशतवादी विचारधारेच्या प्रसाराचे काम तो करत होता. तरुणांची माथी भडकावून तो त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adnana ali sarkar is the leader of isis in the state till august 8 in nia custody amy