पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाकडे पक्षाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाठ फिरविली. पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा कार्यक्रमात होती. तसेच पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. मात्र, शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षांच्या न लावलेल्या फलकांची देखील चर्चा होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त शहर राष्ट्रवादीकडून पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पक्षाचे नेते अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, दिवसभर घडलेल्या घडामोडींमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाराजीचे खंडनही केले. तसेच अजित पवार मुंबईहून पुणे जिल्ह्यात येईपर्यंत शहर पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर अचानक ते संपर्काच्या बाहेर गेले आणि रात्री आठच्या सुमारास पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी अजितदादा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाकडे अजित पवारांनी पाठ फिरविल्याची चर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये होती.

दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड दिल्लीतील पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर केली. त्यानंतरही शहराच्या पक्ष कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकांमध्ये एकही फलक नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षांचा नव्हता, याचीही चर्चा रंगली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar out of contact network after coming to pune pune print news psg 17 ysh