पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटपावरून झालेल्या वादातून दोन गटांत मध्यभागातील गंज पेठेत वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परस्पर विरोधी फिर्यादीनंतर दोन्ही गटांतील २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे गंजपेठेत तणाव निर्माण झाला. मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्ते गंज पेठ चौकीसमाेर जमा झाले होेते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत नीता किशन शिंदे (वय ४२, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर, निर्मल हरिहर, हिरा हरिहर यांच्यासह १५ ते १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नीता शिंदे रात्री घरी होत्या. त्या वेळी विष्णू हरिहर आणि १५ ते १६ जण गंज पेठेत आले. शिंदे यांनी पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरून त्यांचा भाऊ कुणाल यास धक्काबुक्की केली. तुला माज आलाय का, तुझ्या घरी खायला नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्याच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी कुणाल याला फळीने मारले आणि सावधान मित्र मंडळाच्या मागे मोकळ्या पटांगणात शिंदे यांच्या मावशीला धक्काबुक्की करण्यात आली. शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, असे नीता शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा – “मी एक लाख मतांनी निवडणूक जिंकणार”, भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला विश्वास

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तेथे गेले. त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पहाटे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हिरालाल नारायण हरिहर (वय ६७, रा. गंज पेठ) यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हिरालाल हरिहर रात्री साडेअकरा वाजता सावधान मित्र मंडळाजवळ मारुतीचे दर्शन घेऊन घरी जात होते. त्या वेळी विशाल कांबळे याने इकडे कशाला आलास, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. हरिहर त्यांना समजावून सांगत होते. त्या वेळी कांबळे आणि साथीदारांनी त्यांना पटांगणात नेऊन फळीने मारहाण करण्यास सुरुवात केली. हरिहर यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तेव्हा याला जिवंत सोडायचे नाही, अशी धमकी देण्यात आली, असे हिरालाल हरिहर यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था

सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक राहुल जोग यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

गंज पेठेत तणाव

पैसे वाटपावरून दोन गटांत झालेल्या वादावादीनंतर गंज पेठेत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त मागवून घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegation of distribution of money for voting case against ex corporator of bjp pune print news rbk 25 ssb