पुणे: आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असून अगदी काही तास शिल्लक राहिले आहे. तर शहरातील गणेश मंडळ किंवा घरगुती बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. तर पुण्यातील मानाच्या पाच गणपतीपैकी पाचवा केसरीवाडा गणपतीचे टिळक पंचांग नुसार १९ ऑगस्ट रोजीच आगमन झाले आहे. तर आता उर्वरित मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जवळपास दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत होणार आहे. तर आता कोणत्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना किती वाजता होणार जाणून घेऊया!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानाचा पहिला कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना ११ वाजून ३७ मिनिटानी होणार, श्री मोरगावचा गणपती मंदिराचा देखावा: अध्यक्ष श्रीकांत शेटे

मानाचा पहिला कसबा गणपतीचे यंदा १३१ वर्ष साजर करीत आहे.प्रत्येक वर्षी भाविकांसाठी उत्सव मंडपात विविध प्रतिकृती साकारण्यात येत असतात. तर यंदा श्री मोरगावचा गणपती मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे. श्री मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान होणार आहे. अभिजीत धोंडेफळे यांनी मूर्ती साकारली असून के.एम.रुग्णालय, ओपोलो टॉकीज आणि फडके हौद चौक असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. तर या मिरवणुकीत मागील ८० वर्षापासुन प्रभात ब्रास बॅण्ड सेवा देत असून ते देखील असणार आहेत. तसेच त्यांच्या साथीला संघर्ष, श्रीराम ढोल ताशा पथक हे असणार आहेत. ११ वाजून ३७ मिनिटानी अर्थगीमठाचे मठाधी अण्णा महाराज यांच्या हस्ते श्री प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. तसेच यंदा सुवर्णजडीत मुकुट अर्पण केला जाणार आहे.

आणखी वाचा-गणेशोत्सवाच्या काळात पिंपरीत चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके; दामिनी पथक सज्ज

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाने गणरायाच्या वाहनांचा देखावा, तर ११.५० वाजता होणार प्राणप्रतिष्ठापना : विश्वस्त प्रशांत टिकार

श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे १३१ वे वर्ष आहे. ‘श्रीं’चा आगमनाची मिरवणुक पारंपरिक पद्धतीने सकाळी ठीक ९.३० वाजता नारायण पेठेतील न.चिं.केळकर रस्त्यावरील मंदार लॉज (गुळुंजकर यांच्या घरापासून)येथून निघेल, कुंटे चौक, नगरकर तालीम, अप्पा बळवंत चौक मार्गे उत्सव मंडपात पोहोचेल. तर या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंन्ड, शिवमुद्रा ढोलताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक अशी मिरवणुक असणार आहे. दुपारी ११.५० वाजता श्री भूषण महारुद्रा स्वामी महाराज, सज्जनगड सातारा.(श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज) यांच्या हस्ते गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तसेच उत्सव मंडपात श्री गणेश मंदिर करणार असून श्री मुग्दल पुराणातील श्री गणेशाच्या विविध अवतारांमधील पाच वेगवेगळी वाहने शेषनाग, सिंह, नंदी, मोर, घोडा श्रींसाठी करणार आहोत. दर दोन दिवसांनी वाहन बदलणार आहे.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा बालाजी मंदिराचा देखावा, तर १ वाजून ४५ मिनिटांनी होणार प्राणप्रतिष्ठापना: अध्यक्ष पृथ्वीराज परदेशी

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ यंदा १३७ वर्षांत पदार्पण करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. बाप्पाची मिरवणुक फुलांच्या आरसमधून निघणार असून मिरवणूक मार्ग गुरुजी तालीम मंदिर, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक मार्गे उत्सव मंडप अशी मिरवणुक असणार आहे. तर या मिरवणुकीत अभेद्य, गुरुजी प्रतिष्ठान आणि शिवप्रताप हे तीन ढोल ताशा पथक असणार आहे. तर उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी पुनीत बालन यांच्या प्राणप्रतिष्ठापना यांच्या हस्ते १ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे. तसेच यंदा बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे. तर तिरुपती बालाजी मंदिरामध्ये भाविकांना लाडूच्या प्रसादचे वाटप केले जाते. त्याप्रमाणे आपल्या येथे दर्शनाला येणार्‍या भाविकांना लाडूच्या प्रसादचे वाटप केले जाणार आहे.

आणखी वाचा-‘दगडूशेठ गणपती’ची प्रतिष्ठापना सरसंघचालकांच्या हस्ते; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही येणार

मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचा महाकालेश्वर मंदिराचा असणार देखावा, तर ११ वाजून ३० वाजता होणार प्राणप्रतिष्ठापना : अध्यक्ष विशाल पवार

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळ यंदा १० वाजता राम मंदिर येथून पालखीमधून मिरवणुकीला सुरुवात होईल.तेथून पुढे बाबू गेनू चौक, जिलब्या मारुती चौक, शनिपार चौक येथून गणपती चौक आणि पुढे उत्सव मंडपात बाप्पा विराजमान होणार आहेत. पुणे मर्चंटचे अध्यक्ष राजेंद्र बाटिया आणि उद्योजक राजेश शाह यांच्या हस्ते ११.३० प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर यंदा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे. बाप्पाला सोन्याचे दात आणि जाणव भाविक अर्पण करणार आहेत.

टिळक पंचांगनुसार केसरीवाड्यात २० ऑगस्ट २०२३ रोजी गणरायाचे आगमन : विश्वस्त रोहित टिळक

मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव टिळक पंचांग नुसार आजपर्यंत साजरा करीत आला आहे. त्या प्रमाणे २० ऑगस्ट २०२३ रोजी केसरीवाडा येथे ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले आहे. पण आपल्या इतर दिनदर्शिकेनुसार १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणपतीचे सर्वत्र आगमन होत आहे. पण आम्ही २० ऑगस्टपासून नियमित पूजाअर्चा आणि कार्यक्रम घेत आहोत, तर बाप्पाचे विसर्जन २८ तारखेला होणार आहे. तर या एक महिन्याच्या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At what time will the pratishthapana of manache ganpati in pune svk 88 mrj