पुणे : वाहनाला आकर्षक नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) या क्रमाकांचा काळाबाजार सुरू झाला आहे. यासाठी आरटीओतील दलालांनी पर्यायी यंत्रणा उभारली असून, प्रसंगी कर्मचाऱ्यांनाही धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महागडी मोटार खरेदी केल्यानंतर तिला क्रमांकही आवडीचा हवा, अशी अनेकांची हौस असते. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याची त्यांची तयारी असते. यामुळे आरटीओकडून आर्थिक वर्ष २००४-०५ पासून आकर्षक क्रमांकांचा लिलाव करण्यास सुरुवात झाली. त्यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळणारा महसूल वर्षानुवर्षे वाढत आहे. आरटीओला आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांतून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आकर्षक वाहन क्रमांकाच्या लिलाव प्रक्रियेत आता दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यांच्याकडून या क्रमांकाचा काळाबाजार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा – ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका

आकर्षक क्रमांकासाठी सुरुवातीला क्रमांकनिहाय निश्चित केलेले शुल्क भरावे लागते. हे शुल्क धनाकर्षाद्वारे भरावे लागते. आरटीओतील दलालांनी यासाठीच्या धनाकर्षाची बेकायदा विक्री सुरू केली आहे. समोरच्या व्यक्तीला किती तातडीची गरज आहे, त्यानुसार या धनाकर्षाची किंमत वाढत जाते. आरटीओत अनेक दलाल अशा धनाकर्ष विक्रीत गुंतलेले आहेत. आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करणारेही काही दलाल आहेत. लिलावावेळी हे दलाल ठरावीक आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला गाठतात. त्याच्याकडे पैशाची मागणी करतात. त्याने पैसे न दिल्यास लिलावात बोली लावून तो क्रमांक खरेदी करून दुसऱ्या व्यक्तीला विकण्याची धमकी देतात. याचबरोबर ठरावीक क्रमांकासाठी आरटीओतील कर्मचाऱ्यांवरही दबाव आणला जातो, असे सूत्रांनी सांगितले.

रात्रीपासून आरटीओमध्ये ठाण मांडून

आकर्षक क्रमांकाचा लिलाव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहन क्रमांकाची नवीन मालिका सर्वांसाठी खुली होते. त्यात लिलावात न गेलेले आकर्षक क्रमांक असतात. ही मालिका खुली होण्याच्या आधीच्या रात्रीपासून अनेक जण कार्यालयात रांग लावतात. मालिकेतील लिलावात न गेलेल्या आकर्षक क्रमांकांची खरेदी करण्यासाठी दलाल रात्रभर कार्यालयात ठाण मांडून बसतात. नंतर सकाळी या क्रमांकाची खरेदी करून त्याची विक्री इतरांना जास्त पैसे घेऊन केली जाते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – शिवाजी आढळराव हे रडीचा डाव खेळत आहेत; अमोल कोल्हेंचा टोला, थ्री इडियट चित्रपटातील सांगितला ‘तो’ प्रसंग

आकर्षक क्रमांकाची लिलाव प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमावलीत दुरुस्ती करावी लागेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा विचार सध्या सुरू आहे. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black market in pune rto alternative mechanisms set up by brokers pune print news stj 05 ssb