लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : ‘लेझर बीम’च्या वापरामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोळे निकामी होतात. लहान मुले व वयोवृद्धांना इजा पोहोचू शकते. त्यामुळे ‘लेझर बीम’चा वापर टाळण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेश मंडळांना केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेतील श्री मोरया पुरस्काराचे वितरण आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झाले. त्या वेळी चौबे बोलत होते. या वेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार उपस्थित होते.

आणखी वाचा-अजितदादांना बालेकिल्ल्यात धक्का बसणार? माजी आमदाराने घेतली शरद पवार यांची भेट

गणेश मूर्तीवर मौल्यवान दागिने असणाऱ्या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रींच्या मूर्तींच्या संरक्षणासाठी मंडळाचे कार्यकर्ते किंवा खासगी सुरक्षारक्षक २४ तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पोलीस आयुक्त चौबे यांनी केले.

पुढील वर्षी बाल गणेश मंडळांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गणेश मंडळांनी केलेल्या विविध उपक्रमांचे सुरुवातीपासूनच परीक्षण करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतेच मंडळ स्पर्धेपासून वंचित राहणार नाही. शहरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे चौबे म्हणाले.

आणखी वाचा-अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं

शरयू प्रतिष्ठान प्रथम

पोलीस आयुक्त स्तरावर निगडीतील शरयू प्रतिष्ठानाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक बावधन येथील सिद्धीचा गणपती महिला मंडळ आणि तृतीय क्रमांक मोशीतील श्री शिवशंभो प्रतिष्ठानाने पटकाविला.

परिमंडळ एकमध्ये भोसरीतील पठारे-लांडगे तालीम मित्र मंडळ, दापोडीतील आझाद मित्र मंडळ, चिंचवड येथील त्रिमूर्ती मित्र मंडळाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला.परिमंडळ दोनमध्ये रहाटणीतील कोकणे चौक मित्र मंडळ, किवळेतील श्री बापदेव मित्र मंडळ ट्रस्ट, पुनावळेतील अमर तरुण मंडळाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.

परिमंडळ तीनमध्ये शाहूनगर येथील साई मित्र मंडळ, रुपीनगरमधील क्रांतिज्योत मित्र मंडळ आणि भोसरीतील नवमहाराष्ट्र तरुण मंडळाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला.