डिजिलॉकरद्वारे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध

राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी प्रदान समारंभ बंद केले जाणार आहेत. पुढील काही दिवसांत त्याबाबत सूचना दिली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र थेट डिजीलॉकरमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च व तंत्र शिक्षणातील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती अशा विषयांबाबत पाटील यांनी माहिती दिली. सध्याच्या काळात काळा झगा आणि मोठ्या टोप्या घालून भव्य पदवी प्रदान समारंभ साजरे करण्याची गरज नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थी डिजिलॉकरद्वारे प्रमाणपत्रे कुठेही आणि कधीही उपलब्ध करून घेऊ शकतात. याबाबतची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: गिरीश बापट यांची पोकळी भरून काढणारा नेता आज भाजपकडे नाही

करोना काळातील आर्थिक अडचणींमुळे शुल्क प्रतिपूर्तीवर परिणाम झाला. मात्र प्रलंबित शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम शिक्षण संस्थांना देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच विद्यार्थी शुल्क प्रतिपूर्तीबाबत स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

खासगी विद्यापीठांमध्ये दहा टक्के जागा राखीव

खासगी विद्यापीठांमध्ये दहा टक्के जागा राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. या जागांवरील प्रवेश स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेद्वारे होईल. त्यामुळे गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया होईल. या विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क शासनाकडून भरले जाईल. तर ५० टक्के शुल्क विद्यापीठे भरतील. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण घेता येईल. या संदर्भात खासगी विद्यापीठांच्या प्रतिनिधींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक झाली आहे. त्या संदर्भातील नियमावली लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Graduation ceremonies in universities are now closed pune print news ccp14 amy
First published on: 29-03-2023 at 19:30 IST