पुणे : हडपसर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी १२ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा, तसेच दंडामधील १० लाख रुपयांची रक्कम सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्नीला देण्याचे आदेश विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले. अमित अर्जुन फल्ले, अनिल तुकाराम सोमवंशी, अनिल सुभाष राख, धनाजी आनंदा वनांगडे, आशुतोष अशोक बुट्टे पाटील, गणेश रामानु चव्हाण , धीरज अनिल ढगरे, अनिल बापू माने, राजेंद्र रावसाहेब कांबळे, अमित चंद्रकांत घाडगे, जगन्नाथ केरबा चौगुले, बाबासाहेब भगवान हरणे अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. सचिन शहाजी शेलार (वय ३२, काळेबोराटे नगर हडपसर) असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. हेही वाचा : गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. रानडे यांना अस्थिर करण्याचे प्रयत्न सचिन शेलार सामाजिक कार्यकर्ते होते. आरोपींचे एकाशी भांडण होते. सचिन विरोधकांशी बोलायचे. सचिन सामाजिक काम करत असल्याने त्यांची लोकप्रियता वाढली होती. त्यामुळे आरोपी त्यांच्यावर चिडून होते. २७ सप्टेंबर २०१४ मध्ये आरोपींनी काळेबोराटेनगर परिसरात सचिन यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला. आरोपींनी सचिन यांच्यावर ५६ वार केले होते. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली होती. खून झाल्यानंतर आरोपी नऊ वर्ष कारागृहात होते. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्वला पवार यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून खून प्रकरणात २० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. हेही वाचा : देशभरात कडधान्ये, तेलबियांच्या पेरणीत वाढ खटला सुरु होत नसल्यामुळे आरोपींनी उच्च न्यायालयात जामिन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. निकालाची प्रतीक्षा असतानाच आरोपीना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. हडपसर विभागाचे तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त राजन भोगले यांनी याप्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश पवार, अविनाश गोसावी, संभाजी महांगरे, राजेंद्र कांबळे यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.