पुणे : पुणे मेट्रोच्या प्रवाशांना आता परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा बंद होणार आहे. महामेट्रोकडून १ मार्चपासून हा नवीन नियम लागू केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करताना एकदाच परतीचे तिकीट काढण्याऐवजी आता जाताना आणि येताना वेगवेगळे तिकीट काढावे लागेल. त्यामुळे या निर्णयाचा फटका प्रवाशांना बसणार आहे. सध्या पुणे मेट्रोची सेवा पहिल्या टप्प्यातील मार्गिका १ -पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि मार्गिका २ – वनाझ ते रुबी हॉल अशा एकूण २४ किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा सुरु आहे. उर्वरित ९ किलोमीटर मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. सध्याची मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे ५५ हजार आहे. ही प्रवासी संख्या कमी असल्याने ती वाढविण्यासाठी महामेट्रोकडून सातत्याने पावले उचलली जात आहे. संपूर्ण मेट्रो मार्गिका खुल्या झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढेल, असा महामेट्रोचा अंदाज आहे.

हेही वाचा : तुमच्या भागात पाणी नाही? करा ‘या’ ठिकाणी तक्रार

प्रत्येक मेट्रो स्थानकावर तिकीट खिडक्यांवर सकाळी आणि सायंकाळी गर्दी दिसून येते. यामुळे मेट्रो प्रवाशांना मेट्रोचे अॅप, व्हॉट्सअॅप क्रमांक, एटीव्हीएम यंत्राच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधाही देण्यात आली आहे. याचबरोबर प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून परतीच्या तिकिटाची सुविधाही महामेट्रोने उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता महामेट्रो प्रशासनाने परतीच्या तिकिटाची सुविधा १ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाताना आणि येताना असे दोन वेळा तिकीट काढावे लागणार आहे. यामुळे त्यांचा वेळ जाणार आहे. याबद्दल प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा आजही राहणार विस्कळीत

दरम्यान, याआधी महामेट्रोने प्रवाशांसाठी तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणे बंधनकारक केले होते. अनेक जण तिकीट काढून मेट्रो स्थानकात गेल्यानंतर आतमध्ये निवांत बसतात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची विनाकारण गैरसोय होते. यावर उपाय म्हणून महामेट्रोने प्रवाशांसाठी तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर २० मिनिटांत प्रवास सुरू करणे बंधनकारक करण्याचे पाऊल उचलले. याचबरोबर तिकीट काढून स्थानकात प्रवेश केल्यानंतर प्रवास संपवून प्रवाशाने ९० मिनिटांत बाहेर पडणे बंधनकारक केले.