पुणे : शिवसेनेकडे (शिंदे) सर्व काही आहे. भावनिक मुद्दे आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही दैवते आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व आहे. मात्र, शिवसेना कुठे आणि का कमी पडते, याचा विचार करावा लागेल, असे राज्याचे शिवसेनेचे (शिंदे) पुणे संपर्क प्रमुख, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले. पक्ष वाढीवर लक्ष केंद्रीत करा. तक्रारी दूर ठेवा. कोण काम करत आहे आणि कोण करत नाही, यावर माझे लक्ष राहील, असा इशाराही सामंत यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक झाली. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, जुन्नरचे आमदार शरद सोनावणे, कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहर प्रमुख नाना भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांच्यासह सर्व संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

‘संपर्कप्रमुख या नात्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि प्रभागात संघटना बांधणीबाबतचा आढावा यापुढे नियमित घेतला जाईल. पक्षात गटबाजी करण्याऐवजी शिवसेना हाच एकच गट असल्याच्या भावनेतून पदाधिकाऱ्यांनी काम करावे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्यात यावे.’ अशी सूचना सामंत यांनी केली.

ते म्हणाले की, शिवसेनेचे अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे. पक्षाच्या अस्तित्वाला महत्त्व असून पक्षातील स्वत:च्या अस्तित्वाला नाही. आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्यासंदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे घेतील. शिवसेनेकडे सर्वकाही आहे. भावनिक मुद्दे आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही दैवते आहेत. मात्र त्यानंतरही आपण कुठे आणि का कमी पडतो, याचा विचार करावा लागेल. एकनाथ शिंदे यांना अपेक्षित संघटना तयार करावी लागेल. पक्षामध्ये नव्यांना घेताना जुन्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे येत्या काळात तक्रारी करण्याऐवजी पक्षवाढीला प्राधान्य द्यावे. कोणता पदाधिकारी काय करत आहे, यावर लक्ष राहील. निवडणुकीच्या दृष्टीने संपर्कप्रमुख तळागाळातीलच नियुक्त केले जातील.’

‘धंगेकरांचा विजय निश्चित होता’

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत माजी आमदार रवींद्र धंगेकर विजयी होतील, याची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्पना होती. जलवाहिनीमध्ये ज्या प्रमाणे पाणी फिरत असते, त्याप्रमाणे धंगेकर यांच्या सारखे आमदार मतदारसंघात मोटारसायकलवरून फिरत असतात. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune uday samant said think about areas where shivsena lacks pune print news apk 13 css