भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा औरंगाबाद येथे झालेला शाही विवाह सोहळा टीकेचे लक्ष्य झाल्याच्या पाश्र्वभूमीवर आणि मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवडय़ात ‘उन्मत्त होऊ नका, पक्षात व्हीआयपी संस्कृती आणू नका, काँग्रेस, राष्ट्रवादीसारखे वागू नका,’ अशा शब्दात लोकप्रतिनिधींना समज दिल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कन्येचा भव्य-दिव्य विवाह सोहळा रविवारी (७ मे) बालेवाडी येथे होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार संजय काकडे यांची कन्या कोमल आणि सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांचा पुत्र रोहन यांचा विवाह सोहळा रविवारी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होत आहे. केंद्रीय मंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, भारतीय जनता पक्षाचे तसेच अन्य पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील मंडळी या विवाह सोहळ्यात उपस्थित राहणार असून हा शाही विवाह सोहळा चर्चेचा विषय झाला आहे. दुष्काळ तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यात सातत्याने गाजत असताना दानवे यांच्या मुलाचा जो शाही विवाह सोहळा औरंगाबाद येथे आयोजिण्यात आला होता त्या सोहळ्यावर तसेच त्या सोहळ्याच्या खर्चावर राज्यात जोरदार टीका झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर काकडे यांच्या कन्येचा विवाह सोहळा होत असून त्याची भव्यता आणि आयोजनावर सुरू असलेला खर्च पाहता हा सोहळाही शाही ठरणार आहे.

या सोहळ्यासाठीची तयारी बालेवाडी येथे गेले काही दिवस सुरू होती. सोहळ्यासाठी भव्य शामियान्यासह फुलांची व अन्य सजावट करण्यात आली असून विवाह मंडपाचीही आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात चिंचवड येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची जी बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना पक्षात व्हीआयपी संस्कृती आणू नका, असे स्पष्टपणे सांगितले होते. ‘या संस्कृतीत जाऊ नका. भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. मात्र सत्तेने उन्मत्त होऊ नका.

ज्या चांगल्या गोष्टी आपण भाषणात बोलतो त्या प्रत्यक्षातही आणा. काँग्रेस, राष्ट्रवादीसारखे वागू नका,’ असेही मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र या गोष्टींचा कोणाताही परिणाम पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर झाला नसल्याचे चित्र आहे.

बालेवाडीत विवाह सोहळा कसा?

बालेवाडी क्रीडा संकुलाचा वापर यापुढे फक्त क्रीडा विषयक उपक्रमांसाठीच केला जाईल. ही वास्तू फक्त खेळांसाठीच वापरता येईल. विवाह सोहळे वगैरे कार्यक्रमांना यापुढे हे संकुल दिले जाणार नाही, अशी घोषणा सांस्कृतिक व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र ती घोषणाच ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sanjay kakade daughter royal wedding ceremony