पिंपरी चिंचवड पोलिसांनी कुख्यात रावण गँगच्या मुसक्या आवळल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने क्रूर अशा रावण गँगच्या चार गुंडांना अटक केली आहे. कराड पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली असून साताऱ्यातून अटक करण्यात आली. यावेळी गोळीबाराच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
सुरज चंद्रदत्त खपाले, हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे, सचिन नितीन गायकवाड, अक्षय गोपीनाथ चव्हाण अशी रावण टोळीतील मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गोळीबाराच्या दोन गुन्ह्यातील फरारी अरोपी अनिरुद्ध उर्फ बाळा उर्फ विकी राजू जाधव (वय 24, रा. जाधववस्ती, रावेत) यालाही पोलिसांनी अटक केली.
कराडमधून अटकेची कारवाई –
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, “अटक करण्यात आलेल्या रावण गँगच्या गुंडांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हेगाहीर वाढू लागल्यानंतर त्यांच्याविरोधात मकोकाअंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. हे सर्वणज फरार होते. गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांच्या टीमने १० दिवस गोवा, महाबळेश्वर, कराडमध्ये आरोपींचा शोध घेतला. यानंतर ते कराड तालुक्यातील घारेवाडी गावात लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आरोपींना अटक करण्यात आली”.
दोन पिस्तूल जप्त
रावण गँगच्या चार गुंडांसहित अनिरुद्ध जाधव यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जळगाव, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दाखल गुन्ह्यात तो फरार होता. सूरज, ह्रतिक, सचिन आणि अक्षय या आरोपांना चिखली तर अनिकेत जाधवला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. अनिकेतकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.