पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे सत्र रविवारीही शहर आणि जिल्ह्यात कायम राहिले. शहरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले. जिल्ह्यातील पणदरे येथे सर्वाधिक १०४.८ मिलीमीटर, दौंड येथे ९८ मिलीमीटर, तर शहरातील वडगाव शेरी येथे ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुणे जिल्ह्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार पावसाने जिल्ह्यातील काही भागांना अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे ओढ्यांना पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरणे, नागरिक अडकणे अशा घटना घडल्या. प्रशासनाला मदतकार्यासाठी पथके रवाना करावी लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पणदरे येथे सर्वाधिक १०४.८ मिलीमीटर पाऊस पडला. त्याशिवाय जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही जोरदार सरी बरसल्या. दौंड येथे ९८ मिलीमीटर, लोणावळा येथे ७६, बारामती येथे ७७, माळेगाव येथे ८२.८, वडगाव येथे ९६.४, लोणी येथे ८६, सुपा येथे ७६, भिगवण येथे ६३.३, ढमढेरे येथे ३५.५, निमगिरी येथे २८, माळीण येथे २७, इंदापूर येथे २३.५, नारायणगाव येथे १७, डुडुळगाव येथे १२.५, गिरिवन येथे ७, लवासा येथे ६, राजगुरूनगर येथे ५.५, तर भोर येथे ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात वडगाव शेरी येथे ३४, हडपसर येथे २५, मगरपट्टा येथे ८, कोरेगाव पार्क येथे ५ आणि एनडीए येथे ३.५ मिलीमीटर पाऊस पडला.