पुणे : गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकल्याने पोलीस शिपायाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई कृष्णा सावंत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई शिंदे आणि सहकारी सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सदाशिव पेठेत गस्त घालत होते. भावे हायस्कूलसमोर टोळके गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर सावंत आणि सहकारी दुचाकीवरुन तेथे पोहोचले. तेव्हा पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला हटकले.
गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले. त्या वेळी टोळक्यातील एका तरुणाने पोलीस शिपाई सावंत यांना शिवीगाळ करुन त्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करणारा तरुण पसार झाला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबु्क्की केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd