पिंपरी चिंचवड : वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. त्यांच्यात आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळत आहेत. वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प स्वतः हून महाराष्ट्रात आला होता. तळेगाव येथे हा प्रकल्प होणार होता. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली आणि तो प्रकल्प गुजरातला गेला. असे काय घडले त्या बैठकीत ? मविआ सरकारने कमिशन, वसुली मागितली का? हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करायला हवे असे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात येणारी कंपनी महाविकास आघाडीच्या वसुली कार्यक्रमामुळे सोडून गेली, कंपनीसोबतचा करार झाला असेल तर तो जाहीरपणे दाखवा अन्यथा महाराष्ट्राची दिशाभूल केल्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी असे आव्हान राम कदम यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. राम कदम पुण्याच्या वडगावमध्ये बोलत होते. ते भाजपच्या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम कदम म्हणाले की, महाविकासआघाडी सरकार हे खोटारडे, वसुलीबाज, कमिशनखोर होते. आदित्य ठाकरे हे जे काही बोलले आहेत ते किती खरे आहे खोटे आहे, याचा आज पर्दाफाश होणार आहे. MIDC, प्रशासनाला येथे येऊन सांगावे लागेल की नेमकी वस्तुस्थिती काय आहे. वेदांता- फॉक्सकॉन कंपनी दीड लाख कोटींची गुंतवणूक करणार होती. ती कंपनी अचानक रातोरात का निघून गेली, जाण्याचे काय कारण?, कंपनीच्या मालकांनी त्या वेळच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्याभेटीत अस काय ठरले होते? त्यांनी तीन ठिकाणी जागा पाहिल्या, तळेगाव येथील जागा निश्चित देखील केली पण, आदित्य ठाकरे यांना नेमके सांगावे लागेल की जशी तुमच्या सरकारची शंभर कोटींची वसुली संपूर्ण देशाने पाहिली तशी या कंपनीला वसुली, मोठ कमिशन मागितले होते का? या गोष्टींचा खुलासा करावा तुम्हाला करावा लागेल असे राम कदम म्हणाले आहेत. 

हेही वाचा : पिंपरी चिंचवड : शंभर खोके मातोश्री ओके , ठाकरे- पवार चोर है अशा घोषणा देत वेदांता- फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक

महाविकास आघाडी सरकार फुटक्या पायांचं

रातोरात जी कंपनी सर्व काही कबूल करते. स्वतः याठिकाणी येण्याच ठरवते, ती कंपनी निघून का जाते? आदित्य ठाकरे ह्यांनी जी सभा घेतली ती खोटे बोलण्याची सभा होती. खरे काय ते महाराष्ट्राला आज कळेल, ज्यांना स्वतःचे आमदार सांभाळता येत नाहीत. जगाच्या पाठीवर असे कधी घडले नाही की मंत्री सोडून जातात. मंत्री सोडून गेले तरी त्या काळच्या मुख्यमंत्र्यांना कानोकान खबर नाही. हे सरकार फुटक्या पायांचं सरकार होते की ज्या दिवशी सत्तेत आले त्या दिवसापासून एक ही दिवस चांगला राज्याच्या जनतेने पाहिला नाही. लोक करोनामध्ये तडफडून मेली तरी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले नाहीत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram kadam criticism foxconn project goes to gujarat due to mahavikas aghadis recovery programme aditya thackeray pimpri chinchwad kjp
First published on: 26-09-2022 at 15:32 IST