नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत.  शिवसैनिक आता आक्रमक झाले असून त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं तसंच निदर्शनं कऱण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवरही शिवसैनिकांनी दगडफेक केली असून त्यात या मॉलचं बरंच नुकसान झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. कुठे आंदोलनं सुरु आहेत तर कुठे दगडफेक. नाशिकमधल्या भाजपा कार्यालयावरही शिवसैनिकांनी दगडफेक करत तोडफोड केली. युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या मुंबईतल्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक समोर आल्याने जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर धडक देत आंदोलन सुरु केलं आहे.

हेही वाचा – राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद! नाशिक, सांगली, चिपळूणमध्ये सेना-भाजपा आमने-सामने

दरम्यान, नाशिकसह चिपळूण, सांगली, औरंगाबाद, मुंबईमध्ये देखील शिवसैनिकांची आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. चिपळूणमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आहे. राणे यांची जन आशीर्वाद चिपळूणमध्ये आल्यानंतर आता भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी आक्रमकता दिसून आली आहे. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. राणेंच्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच बहादूर शेख नाका परिसरात हा सर्व प्रकार सुरु असताना पाहायला मिळल आहे. दरम्यान, दोन्ही बाजूला कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसैनिकांनी नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलेला असताना दुसरीकडे सांगलीत देखील शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. राणेंच्या पोस्टरला काळं फासून शिवसेनेकडून आपला निषेध नोंदवण्यात आला आहे.  इथे देखील राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena supporters attacked on r deccan mall in pune which is owned by narayan rane vsk