राम माधव
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस
मोदींच्या या पर्वात स्वयंघोषित बुद्धिवादी देशाच्या बौद्धिक व सांस्कृतिक पटावरून दूर व्हायला हवेत.. बाकी सुरक्षा व इतर व्यूहात्मक आव्हानांना सामोरे जाताना, यंदाचा भक्कम कौल पाहता आधीपेक्षा अधिकच मोठे काम करता येणार आहे..
‘कागदोपत्री उपलब्ध झालेली सारी माहिती पाहता, ज्यांना कोणता ना कोणता आजार आहे अशाच व्यक्ती ट्रम्प यांच्या संदेशाबाबत संवेदनशील आहेत. आमच्या प्रारूपानुसार जर मिशिगनमध्ये मधुमेहाचे प्रमाण सात टक्क्यांपेक्षा कमी असते, तर तो कल डेमॉक्रॅटिक पक्षाकडे हे राज्य पुन्हा येण्यास पुरेसा ठरला असता. त्याच प्रमाणे जर पेनसिल्व्हानियातील आतापेक्षा आठ टक्के अधिक नागरिक जर नियमतिपणे शारीरिक व्यायाम घेत असते, आणि विस्कॉन्सिनमध्ये जर पाच टक्के कमी लोक अतिरिक्त मद्यपान करत असते, तर हिलरी क्लिंटनच व्हाइट हाऊसमध्ये विराजमान होऊ शकल्या असत्या.
ही काही एखाद्या विनोदवीराच्या तोंडची वाक्ये नाहीत.. तर लंडन येथील एका प्रथितयश नियतकालिकाने २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे केलेले हे ‘विश्लेषण’ आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याकडे केंद्रातील भाजपच्या विजयानंतर तथाकथित तज्ज्ञ कसे विश्लेषण करतात, याची प्रतीक्षा आहे. कारण पहिल्यांदा त्यांनी मतदान यंत्राला दोष दिला, त्यानंतर निवडणूक आयोगाला.. शेवटी आता मतदारांनाच दोष देऊन ते थांबतील असे दिसते.
निकाल पाहता हा पूर्णपणे नरेंद्र मोदींच्या बाजूने सकारात्मक जनादेश आहे. अगदी कसलेल्या राजकीय पंडितांना देखील या निकालाने धक्का बसला. हा भाजपसाठी सर्वंकष आणि पाया विस्तारणारा असा जनादेश आहे. जनतेचे मन मोदींनी जिंकले आहे. सत्ताधारी पक्ष लाट निर्माण करू शकत नाही असा एक सार्वत्रिक समज आहे. विरोधक लाट निर्माण करतात. मात्र मोदी हे नेहमी वेगळ्या वाटेने जातात. यावेळी सशक्त अशी लाट सरकारच्या बाजूने त्यांनी निर्माण केली.
अलीकडच्या काळात युद्धशास्त्रातील शब्दावली वापरण्याचा एक प्रघात आहे. उदाहरणार्थ सायबरयोद्धे, माध्यम योद्धे किंवा निवडणुकीची लढाई किंवा हरित योद्धे इत्यादी. एखादा समूह जर एखादी कृती करत असेल तर सहजपणे अशी विशेषणे जोडली जातात. त्या अर्थाने निवडणुका या देखील जणू युद्धासारख्या आहेत असेच प्रतीत होते. जीवनमरणाचा प्रश्न असल्याच्या पद्धतीने त्या त्वेषाने लढल्या जातात. यंदाच्या निवडणुकीबाबतही तसेच काहीसे चित्र होते.
सतराव्या शतकातील प्रशियन योद्धा कार्ल व्हॉन क्लॉज्व्हिट्झ यांचे ‘ऑन वॉर’ हे पुस्तक त्याच्या पत्नीने मरणोत्तर प्रकाशित केले. त्याच्या मते युद्ध म्हणजे ‘राजकारणच, पण बदललेल्या मार्गाने जाणारे’. ‘क्लॉज्व्हिट्झ नीती’ म्हणून या पुस्तकाची कीर्ती आजही आहे. त्याच्या मते युद्धातून तीन गोष्टी निश्चितपणे स्पष्ट होतात. त्यात प्रशासकीय कौशल्य- म्हणजे सर्वसाधारणपणे रणनीतीचे व रसदपुरवठय़ाचे नियोजन, लष्करी पैलू- म्हणजे शस्त्रसाधने व सैन्य, आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘भावनिक घटक’- प्रचार कशावर आधारित आहे आणि कोणत्या युक्त्याप्रयुक्त्या वापरल्या हे महत्त्वाचे असते.
भाजपचे प्रचाराचे नियोजन व रणनीती पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात आली. हे नियोजन विरोधकांच्या पेक्षा कितीतरी पट पुढे होते. जेथे नव्याने जागा मिळण्याची शक्यता आहे, तेथे खूपच मेहनत घेण्यात आली उदा. पश्चिम बंगाल, ओडिशा व ईशान्येकडील राज्ये. या राज्यांमधील निकाल पाहता पक्षाने प्रचारात जे कष्ट केले त्याचे हे फळ मिळाले आहे हेच दिसून येते. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा प्रचार निस्तेज आणि एकांगी होता.
भाजपने त्यांच्या सर्व संघटनात्मक स्रोतांचा उत्तम पद्धतीने वापर केला. पक्षाची जी काही संघटनात्मक रचना आहे ती मतदान केंद्र स्तरापर्यंत एक संघ म्हणून उभी राहिली. त्यांनी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली. विरोधकांकडे याचाही अभाव होता. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत, सारी धुरा अननुभवी नेत्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली.
शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम अशा भावनिक आवाहनाला विरोधकांकडे उत्तर नव्हते. मोदींनी प्रभावीपणे त्यांची प्रतिमा, तसेच सरकारचे गेल्या पाच वर्षांतील विकासाचे कार्यक्रम तसेच त्यांची अंमलबजावणी या साऱ्यांतून पाठिंब्यासाठी जनतेची प्रभावी अशी मनोभूमिका तयार केली. ‘निवडणुकीतील फायद्यासाठी मोदींनी राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे केला,’ असा आरोप विरोधक करतात. मात्र राष्ट्रवाद हा मुद्दा केवळ निवडणुकीचा नाही तर ती भाजपची ओळख आहे. राष्ट्रवादाला जोड देऊन, गेल्या पाच वर्षांत जी काही सरकारने कामे केली आहेत असे सांगण्यासारखे अनेक मुद्दे मोदींकडे प्रचारात होते.
नव्या गोष्टी कशा शिकायच्या आणि कशासाठी शिकायच्या, हे मोदींना पक्के समजते. त्यामुळे नेपोलियनचा मार्ग अनुसरण्यास ते कचरत नाहीत. नेपोलियनचे वर्णन इतिहासकार एरिक हॉब्जबॉमने त्याच्या काही रणनीतींवरून ‘धर्मनिरपेक्ष देवता’ असे केले होते. प्रचारतंत्राचे त्याच्याकडे उत्तम कौशल्य होते. त्याने ‘ल मॉन्यूटर युनिव्हर्सेल’ नावाचे सरकारी वृत्तपत्र चालविले. यातून सातत्याने फ्रेंच जनतेला त्यांचे लष्करी साहस व युद्धातील यशाबाबत माहिती मिळत असे. ‘लोकांना काय खरे वाटते, यालाच महत्त्व आहे’ असे नेपोलियन म्हणत असे. मोदींनी संवादाच्या विविध माध्यमांचा वापर करून अविश्रांतपणे थेट संपर्क ठेवला, त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला जनतेने थारा दिला नाही.
मोदीजी सर्व आघाडय़ांवर सेनापतीप्रमाणे पुढे राहिले. विरोधकांच्या टीकेचे घाव अंगावर घेत त्याला तितक्याच चोखपणे प्रत्युत्तर दिले. ‘युद्धाच्या वावटळीत महान योद्धे मानसिकदृष्टय़ा कणखर असतात. त्यामुळे एखाद्या वादळात जशी नौका हेलावते तसे ते कठीणप्रसंगी होऊ देत नाहीत’ असे क्लॉज्व्हिट्झ यांनी म्हटले आहे. जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे विरोधकांनी ही निवडणूक मोदी केंद्रित ठेवली. या सगळ्याच्या परिणामी असे काही निकाल आले की, मार्क्सवादी इतिहासकार विल्यम डेव्हिस यांचे ‘नेता हेच सत्य बनते’ हे विधान तंतोतंत खरे ठरले.
निकालाचा मथितार्थ पाहिला तर विरोधक भांबावलेले असल्याचेच स्पष्ट होते. मोदी व भाजपने निवडणुकीत जी काही रणनीती आखली ती पाहता विरोधक निरुत्तर झाले. विरोधकांनी जी मांडणी केली ती अप्रस्तुत व दिशाभूल करणारी होती.
मोदींनी दुसऱ्या पर्वात दमदारपणे प्रवेश केला आहे. सरकारचे जे प्राधान्यक्रम आहेत त्याबाबत स्पष्टता आहे. अर्थव्यवस्थेकडे लक्ष देणे हा अग्रक्रमाचा विषय आहे. अर्थव्यवस्थेचे चित्र स्थिर आणि आशादायी आहे. काही महत्त्वाच्या क्षेत्रांना सरकारच्या पाठिंब्याची गरज आहे. चीन व अमेरिका यांच्यात सध्या जे व्यापारयुद्ध सुरू आहे त्यातून आपण अलिप्त राहू असे मानणे चुकीचे ठरेल. तीच बाब अमेरिका व इराण यांच्या भूव्यूहात्मक संघर्षांबाबत आहे. तसेच शेजारी राष्ट्रांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. श्रीलंकेतील घडामोडी तसेच पाकिस्तानशी संबंध या बाबींसाठी पंतप्रधानांना वेळ व लक्ष द्यावे लागणार आहे. भारतीय उपखंडात आपले आर्थिक आणि व्यूहात्मक हितसंबंध बळकट होण्याच्या दृष्टीने मोदी सरकारला लक्ष केंद्रित करावे लागेल. मोदींना २०१९ मध्ये मिळालेला भक्कम कौल पाहता सुरक्षा व इतर व्यूहात्मक आव्हानांना सामोरे जाताना आधीपेक्षा अधिकच मोठे काम करता येणार आहे.
हा जनादेश इतर अर्थानी महत्त्वपूर्ण आहे. मोदींनी मुलाखतीत ज्या खान मार्केट टोळीचा उल्लेख केला, अशा छद्म धर्मनिरपेक्षतावादी किंवा कथित उदारमतवादी टोळक्याचा पराभव झाला किंवा त्यांना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. आतापर्यंत देशातील धोरण ठरविणाऱ्या संस्था किंवा बौद्धिक मक्ता आपल्याकडे आहे अशीच या गटाची धारणा होती. त्यामुळे मोदींच्या या पर्वात हे असले स्वयंघोषित बुद्धिवादी देशाच्या बौद्धिक व सांस्कृतिक पटावरून दूर व्हायला हवेत.
देशातील जनता मोदींकडे केवळ एक केवळ पंतप्रधान नव्हे, तर आमूलाग्र बदल करणारी व्यक्ती म्हणूनच पाहते. नवा भारत निर्माण करणे हेच मोदींचे ध्येय आहे. त्यापासून ते मागे हटणार नाहीत. बदलाचा हा मार्ग सोपा नाही. मात्र सरकारने यापूर्वीच मार्गक्रमण सुरू केले आहे. मोदींच्या या दुसऱ्या पर्वात देशातील जनतेला सरकारकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. त्यामुळे अधिक उत्साहाने त्यांना काम करावे लागणार आहे.