ज्योतिर्मठ आणि द्वारकापीठाचे शंकराचार्य श्री श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी शिर्डीचे साईबाबा आणि शिंगणापूरचे शनिमहाराज यांच्या संबंधीने जे सुविचार मांडले ते ऐकून येथील काहींना हसावे की रडावे की एखाद्या बिनशेंदराच्या दगडावर आपलेच मस्तक आपटून घ्यावे अशी किंचित भावना झाल्याचे समजते. धर्मशास्त्र व्यवस्थित माहीत नसले की अशी भावना मनात येते. महाराष्ट्रात शिर्डीच्या साईबाबांची पूजा होत असल्यामुळे येथे दुष्काळ पडला, तसेच महिलांनी शनीची पूजा केल्यास त्यांच्यावरील बलात्कार वाढतील अशी स्वरूपानंद सरस्वती यांची मूळ विधाने आहेत. आदी शंकराचार्यानी हिंदुस्थानात चार दिशांना चार पीठे स्थापन केली. काही जण आता असे म्हणतात, की या पीठांतील गाद्यांवर पुढे कोण बसणार आहे याचा अणुमात्रही अंदाज आदी शंकराचार्याना असता तर त्यांनी हे कार्य केलेच नसते. परंतु या गाद्यांवर अलीकडच्या काळात आलेल्या काही शंकराचार्यामुळेच तर आज हिंदू धर्म या धरतीवर शिल्लक आहे. सर्व हिंदूंना त्यांचा किती आधार आहे, हे एक हिंदूच जाणू शकतो. मात्र तो हिंदू हा एखाद्या सनातनी आश्रमात जाणारा, रोजच्या रोज नामावळीने वह्य़ा भरणारा वा सदऱ्याच्या खिशाला आपल्या गुरूबाबांच्या तसबिरींच्या लेखण्या अडकविणारा असला पाहिजे. अशा हिंदूलाच स्वरूपानंदजींच्या विधानांतील शास्त्रार्थ समजू शकतो. साईबाबा यांची पूजा करण्यास स्वरूपानंदजी यांचा विरोध आहे, कारण की साईसंस्थानात रोज कोटय़वधींची माया जमा होते याबद्दलचा दुस्वास असे काही पाखंडींचे मत आहे. ते चुकीचे आहे. साईबाबांना देव मानता येणार नाही, कारण की तसे केल्याने अलनिनोमाता, एलनिनोमाता यांचा कोप होतो व त्यामुळे महाराष्ट्रभूमीत दुष्काळादी आपत्ती येतात, असे ते साधे वैदिक गणित आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढते तेव्हा तेव्हा ग्लोबलवॉर्मिग होते व त्यातून प्रलय होतो हे तर विज्ञानानेच सिद्ध झाले आहे. आता याला जे छद्मविज्ञान म्हणतील, त्यांना एकच सवाल विचारला पाहिजे की शनीची पूजा केल्यामुळे महिलांना बलात्कारासारख्या आपत्तींचा सामना करावा लागेल यालाही तुम्ही छद्मविज्ञानच म्हणणार का? वस्तुत: शनी हा पापग्रह असल्याचे खुद्द नासाही मानत आहे. म्हणून तर नासाने अजून शनीवर यान उतरविले नाही. यावरून वैज्ञानिकदृष्टय़ा हेच सिद्ध होते की ज्या अर्थी नासा अजून शनीवर स्वारी करण्यास धजावलेली नाही, त्या अर्थी ज्या महिला शनीची पूजा करतात त्यांच्याकडे समाजातील पापग्रह आपोआपच वळतील. यात अशास्त्रीय असे काय आहे? शिवाय मंदिराच्या गर्भगृहात काही तेजस्वी किरणे असतात. महिलांच्या मेंदूत ती शिरली की तेथील विशिष्ट ग्रंथींवर ती परिणाम करतात. ते घातक असते, हे तर सनातन धार्मिक विज्ञानानेच सिद्ध केले आहे. पाश्चात्त्याळलेले लोक त्यांच्यावर टीका करतात.. हा असला देव, देश आणि धर्मद्रोह जेव्हा बंद होईल तेव्हाच येथील महिला सुरक्षित होतील आणि दुष्काळ पडणार नाहीत. हा मार्ग दाखवून आपले डोळे उघडणाऱ्या विज्ञानवादी शंकराचार्याना तमाम भारतीयांनी कोपरापासून नमस्कार केलाच पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2016 रोजी प्रकाशित
त्यांना कोपरापासून नमस्कार!
महिलांनी शनीची पूजा केल्यास त्यांच्यावरील बलात्कार वाढतील अशी स्वरूपानंद सरस्वती यांची मूळ विधाने आहेत.
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-04-2016 at 05:53 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami swarupanand saraswati comment