मतपेटीतून हुकूमशाहीकडे हा पत्र-लेख (४ एप्रिल) व त्यावरील प्रतिक्रिया (५ व ८ एप्रिल) वाचल्या. के. रं. शिरवाडकर यांनी नेहरू, इंदिरा यांच्या हुकूमशाहीचा पाढा वाचला. मात्र १९७५ साली आणीबाणी लावण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तेव्हा सरकारविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे जयप्रकाशजी यांनी एक फारच बालिश आवाहन केले होते. त्यांनी म्हटले होते की, पोलीस व सनिकांनी, जर त्यांना, त्यांच्या वरिष्ठांनी दिलेले आदेश योग्य वाटत नसतील तर ते पाळू नयेत. हे फारच भयानक होते व त्यामुळे अराजक माजू शकले असते.
स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना इंग्रज अधिकारी मोजकेच होते, तर पोलीस व सनिक हे बहुसंख्येने िहदुस्थानी होते; मात्र तेव्हा महात्मा गांधीजींनी असे आवाहन केल्याचे कुठे वाचले नाही. त्यामुळे आणीबाणी लावायला केवळ हेच कारण असावे, असा निष्कर्ष काढता येतो. दुसरे असे की, अलाहाबाद न्यायालयाने इंदिराजींची निवड रद्द ठरविल्यानंतर त्यांनी लगेच राजीनामा द्यावा असा विरोधकांनी धोशा लावला. आज मात्र हीच मंडळी त्यांच्या एखाद्या नेत्याला खालच्या कोर्टाने दोषी ठरवले तरी, ‘त्याने वरच्या कोर्टात अपील केले आहे व अपिलाचा निकाल लागेपर्यंत तो निर्दोष आहे’ असे मानतात. इंदिराजींना मात्र हा अपिलाचा हक्क बजावू द्यायला विरोधक तयार नव्हते. यांना मात्र एखाद्या बारक्या प्रकरणात कोर्टाने निर्दोष ठरवले तर लगेच ‘क्लीन चिट’चा डंका पिटण्यात येतो.
 हुकूमशहा कधीही निवडणुका घेत नाही. घेतल्या तरी त्या थातुरमातुर असतात आणि त्यात तो हुकूमशहाच पुन्हा ‘प्रचंड’ बहुमतानेच निवडून येतो. इंदिराजींनी मात्र निवडणुका घेऊन पराभव पत्करला. १९७७ च्या निवडणुकांमध्ये असा प्रचार केला गेला होता की, या निवडणुका शेवटच्या आहेत. मात्र त्यानंतर बऱ्याच निवडणुका झाल्या. १९७५ प्रमाणेच या वेळच्या निवडणुकीत काही मंडळी परत सन्याला ओढताहेत, शहिदांच्या विधवांसाठी गळे काढताहेत. अर्थात, वाजपेयी सरकारच्या कारकीर्दीत हकनाक शहीद झालेल्या (१७ एप्रिल २००१ रोजी बांगलादेश सनिकांनी १६ भारतीय जवानांना हाल हाल करून ठार मारले होते.) जवानांची आठवण मात्र येत नाही.
त्यामुळे ‘लोकसत्ता’च्या वाचकांना शिरवाडकरांनी भविष्यापेक्षा इतिहास पाहा असे जरी सुचविले आहे तरी, तो स्वच्छपणे न पाहिल्यास भविष्यच काळे कुट्टच असणार, हे उघड आहे.
– राजेंद्र कडू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाकीच्या सर्व पक्षांतील व्यक्ती दिसत नाहीत?
भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे त्यांची निवडणूक मोहीम मोदी या व्यक्तीभोवती केंद्रित झाली आहे. अनेक पक्ष आणि स्वत:ला पक्षीय राजकारणाच्या वर मानणारे विचारवंत याविरोधात टीकेची झोड उठवत आहेत. त्यामधील अनेकांना यामध्ये हुकूमशाहीची (fascism) बीजे असल्याचा साक्षात्कारही होतो आहे (पत्र-लेख : मतपेटीतून हुकूमशाहीकडे – ४ एप्रिल).
भाजपची फक्त निवडणूक मोहीम व्यक्तिकेंद्रित आहे, पण बाकी सर्व पक्षांमध्ये (फक्त कम्युनिस्ट अपवाद वगळता) सगळी पक्षीय व्यवस्थाच  व्यक्तिकेंद्रित आहे त्याचे काय?
भाजपला एका व्यक्तीचे नाव पुढे आणण्याकरिता बरेच प्रयास पडले यातच सर्व काही आले. काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय, शिवसेना- मनसे आणि ठाकरे कुटुंबीय हे सर्व समानार्थी शब्दच झाले आहेत. शाळेमध्ये ‘जोडय़ा लावा’ सदरात तसा प्रश्न आला तरी आश्चर्य वाटू नये! तीच गोष्ट मायावती, मुलायम, लालू, जयललिता, ममता, करुणानिधी आणि अगदी केजरीवाल यांचीही आहे. पक्ष आणि व्यक्ती यामध्ये जिथे काही फरकच राहिलेला नाही तिथे व्यक्तिकेंद्रित मानसिकता कोणालाच दिसत नाही आणि हुकूमशाहीचा धोकाही दिसत नाही हे मोठे गमतीशीर आहे. या पक्षांनी निवडणुकीत एक असा चेहरा किंवा नेता जाहीर केला काय किंवा नाही काय, फरक काय पडतो? त्यांचे निवडून आलेले सर्व खासदार, आमदार एका ओळीचा ठराव करणार आणि सर्वाधिकार त्या त्या ‘कुटुंबप्रमुखाला’ देणार (जणू काही या सर्वानी देईपर्यंत तसा अधिकार कुटुंबाला नव्हताच!). आणि मग तो नेता स्वत: सत्तापदावर बसणार किंवा त्याचे बाहुले तिथे बसवणार. ही सर्व पद्धत इतकी ठरून गेलेली आहे की, वर्तमानपत्रांनी गेल्या निवडणुकीच्या वेळेची नेतानिवडीची बातमी अगदी जशीच्या तशी छापावी!
कोणत्याही पक्षाने एका व्यक्तीचे नाव खुलेपणाने निवडणुकीपूर्वीच पुढे आणले तर त्याचे खरे तर स्वागत झाले पाहिजे.
    – प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

काय असे पाप या बळीराजाने केले?
‘सह्याद्रीचे वारे’मध्ये सुहास सरदेशमुख यांचा ‘प्रश्नांचा विस्तव, प्रचाराची पोळी’ हा मनाला सुन्न करणारा लेख (८ एप्रिल) वाचला आणि पुन्हा महिन्याभरातील घटनाक्रम आठवला.. देशाचे कृषिमंत्री शरद पवार आले. रात्रभर गारांचा मार सोसून ताटून गेलेल्या बलांच्याच गाडीने सकाळचा फेरफटका मारला. पाय चिखलाने भरू नयेत म्हणून आमच्या बळीराजाने तुमची व्यवस्था केली. पण त्याच्या व्यवस्थेचे काय? पेपरात फोटो येईल एवढी गारपीटग्रस्तांची एक दिवस विचारपूस केली आणि निघून गेलात. पण मागे काय झाले, तर आमचा शेतकरी गळफास घेऊ लागला. मदत मिळायच्या आगोदरच त्याने स्वत:ला जमिनीत गाडून घेतले. कारण हे नेते फक्त पाहणी करून जातात; पुन्हा मागे वळून पाहत नाहीत. सध्या तर सगळेच प्रचारात दंग असल्यामुळे प्रत्येकाला खुर्चीच मिळवायची आहे.
काय असे पाप या बळीराजाने केले? शेतकऱ्यांच्या जिवावर सगळा देश चालतो, पण शेतकऱ्यासाठी कुणीच जीव लावत नाही. आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ऊर बडवून संपूर्ण देशभर फिरायचे; पण त्याला वाली कुणीच नाही. योगायोगाने निवडणुका आल्या म्हणून एवढी विचारपूस तरी सुरू आहे; पण राज्यकर्त्यांनो, जरा मनाला लाजा. अशी अवहेलना करू नका. मेल्यावर मदत करून राजकारण करण्यापेक्षा जिवंत असताना मदत करा, एवढीच अपेक्षा आम्ही करू शकतो.
– रमेश अंबिरकर, डिकसळ (ता. कळंब, जि. उस्मानाबाद)

आवडीने वाचणे वेगळे, आदर्श निराळे
‘कुठे कुरुंदकर, कुठे लँडक्रुझर’ हे पत्र (लोकमानस, ८ एप्रिल) वाचले.  संदीप आचार्य यांचा लेखही (७ एप्रिल) वाचला होताच.पत्रलेखिकेचा थोडासा गरसमज झाला असावा, असे वाटते. आचार्य यांच्या लेखात राज ठाकरे आणि नरहर कुरुंदकर ह्यांची तुलना करण्याचा कोणताही, किंचितही हेतू दिसत नाही, असे मला वाटते. एखादी व्यक्ती, कोणा थोर लेखक/ लेखिकांचे साहित्य आवडीने वाचत असेल, तर केवळ त्या कारणामुळे ती व्यक्ती त्या लेखक वा लेखिकेशी तुलना करण्यायोग्य होते, असा दुर्दैवी निष्कर्ष पत्रलेखिकेने काढलेला दिसतो !
आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत अगणित लोकांनी ज्ञानेश्वरीची पारायणं केलेली आहेत, अनेकांनी आपापल्या परीने त्यावर भाष्यसुद्धा केलेले आहे. त्यांच्यापकी एक तरी पामर  माउलींच्या महानतेच्या आसपास तरी पोहोचतो का?
( मनसेच्या खळ्ळ खटय़ाक ‘संस्कृती’ ची मला ह्या पत्रातून अजिबात म्हणजे अजिबातच भलामण करायची नाहीये, हे कृपया नीट समजून घ्यावे.)
डॉ.  राजीव देवधर, पुणे

सोपे मराठी शब्द नाहीत?
‘परकीय शब्दांचा धुडगुस’ या मथळ्याचे पत्र (लोकमानस, ७ एप्रिल) सगळ्या मराठी व्यक्तींनी, तसेच मराठी चित्रवाणी वाहिन्यांतील निर्णय घेणाऱ्यांनी वाचले पाहिजे;  कारण आज प्रसारमाध्यमांतून मराठी शब्दांऐवजी इंग्रजी/िहदी वापरले जातात.
मराठी वर्तमानपत्रांनी व  मराठी चित्रवाणी वाहिन्यांनी जर सोपे मराठी शब्द वापरले तर मराठी लोकही ते वापरतील. कारण जे शब्द कानावर पडतात, वाचले जातात तेच शब्द  बोलण्यात वापरले जातात. इंग्रजी/उर्दू/ फारसी शब्दांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे सोपे मराठी शब्द तयार केले ते पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाले असतील तर त्याचा तपशील मिळाल्यास बरे होईल.
 तसे पुस्तक नसेल तर ते तयार करून त्याची प्रसिद्धी दिली जावी. त्यामुळे माझ्यासारख्या मराठीप्रेमींना त्याचा उपयोग होईल.
– वासुदेव गजानन पेंढारकर, डोंबिवली

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worry for the future due to methods adopt to see history