|| जयेश सामंत, सागर नरेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डबे पुरवणाऱ्या कंपनीकडून करार रद्द, ‘एमएमआरडीए’वर नामुष्की

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा – ठाणे आणि मीरा रोड  या परिसरांना जोडणाऱ्या चार मेट्रो मार्गाच्या कार डेपोची जागा निश्चित न झाल्याचा आणखी फटका या प्रकल्पाला बसणार आहे. या मार्गावरील मेट्रो गाडय़ांसाठीचे डबे पुरवण्याचे काम देण्यात आलेल्या कंपनीने कार डेपोच नसल्याने डब्यांची निर्मिती आणि पुरवठा करण्याबाबतचा करार रद्द केल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) नामुष्की ओढवली आहे. 

मुंबई मेट्रोसाठी महत्त्वाच्या असलेल्या कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या बाबतही जागेची अनिश्चितता प्रकल्पांच्या रखडपट्टीला कारणीभूत ठरते आहे. वडाळा- घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली या ३२.३२ किलोमीटर मार्गासाठी आवश्यक मेट्रो कार डेपोबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मेट्रो ४ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा, कासारवडवली-गायमुख आणि गायमुख ते मीरा रोडचे शिवाजी चौक असे तीन मेट्रो मार्ग जोडले जातात. त्यामुळे मेट्रो ४, मेट्रो ४ अ, मेट्रो १० आणि मेट्रो ११ अशी ५५.९९ किलोमीटरची मेट्रो सलगता निर्माण होते. पुढे दहिसर- मीरा भाईंदर हा मेट्रो ९ मार्गही याला जोडता येणार आहे. यामुळे मार्गामध्ये गाडय़ांची अदलाबदली करणे सोपे होणार असून पूर्णत: एकच मार्ग होऊ शकेल. या चारही मेट्रो मार्गासाठी एकत्रित कार डेपो बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा निवडण्यात आली. त्यानुसार येथील ४९.५ हेक्टर जागा संपादित करण्यासाठी जमीन मालकांना नोटीस बजावण्यात आली. मात्र, याबाबतची प्रक्रिया लांबल्याने कार डेपोच्या जागेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या अनिश्चिततेमुळेच मेट्रो गाडीचे डबे पुरवणाऱ्या कंपनीने माघार घेतली आहे.

मे. बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्टेशन ऑफ इंडिया आणि मे. बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्टेशन, जर्मनी या भागीदारी कंपनीला २३४ मेट्रो कोचचे संकल्पचित्र, निर्मिती, पुरवठा, चाचणी आणि चालवणे याकरिता स्वीकृतीपत्र दिले होते. मात्र मेट्रो मार्ग ४ साठी आवश्यक असणाऱ्या मेट्रो कार डेपोची जागा अंतिम होत नसल्याने आणि मेट्रो मार्ग ४ चे स्थापत्य काम अपेक्षेपेक्षा संथगतीने सुरू असल्याने  मे. बॉम्बार्डियर यांनी २७ जानेवारी २०२२ रोजी करार संपुष्टात आणला.

तिन्ही मेट्रो मार्गाचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, आता त्याला वेग मिळतो आहे. त्यामुळे हे मार्ग पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे जातील. आता असेही डबे ठेवण्यासाठी जागा नव्हती. दोन वर्षांनंतर पुन्हा निविदा काढून डबे मिळवले जातील. – एसव्हीआर श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancellation of contract company supplying coaches mmrda from chhatrapati shivaji maharaj terminus wadala metro route akp