डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाच क्रमांकाच्या मध्ये एक पादचारी पूल उभारण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. या पुलाच्या कामाला फलाट क्रमांक एक वर असलेले आरक्षण केंद्र बाधित होत आहे. त्यामुळे हे आरक्षण केंद्र पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत फलाट क्रमांक एकवर कल्याण बाजुला सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वर कल्याण बाजुला आरक्षण केंद्राची कार्यालये सुरू करण्यासाठी मुबलक जागा आहे. याठिकाणी लोखंडी संरक्षित डब्यांची दोन कार्यालये सुरू केली जाणार आहेत. याठिकाणी प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची सोय आहे. अलीकडे फलाट क्रमांक एकच्या बाजुला रिक्षा चालक रिक्षा उभ्या करतात. तसेच फलाट क्रमांक एकवरून बाहेर पडणारे प्रवासी प्रस्तावित आरक्षण केंद्राच्या जागेतून बाहेर पडतात. आरक्षण केंद्र सुरू झाल्यानंतर हा रस्ता बंद केला जाणार आहे.

हेही वाचा… मुख्यमंत्री शिंदे यांचे बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन; नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी ठाण्यात ‘रोड शो

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिवा बाजुने डोंबिवली रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्र ते डोंबिवली पूर्व भागातील रामनगर रेल्वे तिकीट खिडकी दिशेने अशा पाच फलाटांना जोडणारा पादचारी पूल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या पुलाच्या मार्गातील फलाटावरील अडथळे दूर करण्याची कामे ठेकेदाराने प्राधान्याने सुरू केली आहेत. या कामात रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राचा अडथळा येत होता. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून रेल्वेने हे आरक्षण केंद्र डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर कल्याण बाजुला सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी लोखंडी संरक्षित तयार डब्यांची कार्यालये तयार करण्यात आली आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकात आरक्षित तिकिटे खरेदीसाठी पहाटेपासून प्रवासी, मध्यस्थांच्या रांगा लागलेल्या असतात. प्राधान्याने तिकीट मिळावे म्हणून अनेक प्रवासी रात्रीच आरक्षण केंद्राच्या बाहेर येऊन बसलेले असतात.

हेही वाचा… …आणि ठाण्यातील रॅली सोडून मुख्यमंत्री गेले लहानग्याच्या मदतीला धावून

या आरक्षण केंद्राच्या बाहेर प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा, बसण्यासाठी आसन, लिहिण्यासाठी मंच अशी व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. नवीन पुलाचे साहित्य ठेवण्यासाठी रेल्वेने ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ जागेची सफाई केली आहे. या नवीन पुलामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात चार पादचारी पूल असणार आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे तीन ते साडे तीन लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. या गर्दीचे विभाजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या पुलांची सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित रेल्वे तिकीट खिडक्या मात्र आहे त्या ठिकाणीच कायम ठेवण्यात येणार आहेत.