बदलापूरः बदलापूर, अंबरनाथसह आसपासच्या परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. दुपारी तीनच्या सुमारास बदलापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. संपूर्ण आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे भर दुपारी सायंकाळ झाल्याचा अनुभव येत होता. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

हेही वाचा – ठाण्यात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून एकाला मारहाण, चितळसर पोलीस ठाण्यात नोंद

हेही वाचा – कल्याणमधील नांदिवली, व्दारलीमधील बेकायदा गोदामे, चाळी भुईसपाट

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी दोननंतर आकाशात ढगांची गर्दी जमू लागली. अडीचनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला. तर संपूर्ण आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे पाऊस कोसळणार याची चाहूल लागली. तीनच्या सुमारास बदलापूर आणि आसपासच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही काळ गारांचाही पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ झाली. गारांचा व्यास कमी असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासाक अभिजीत मोडक यांनी दिली. तर यावेळी वाऱ्याचा वेग सुमारे १०० किलोमीटर प्रती तासापेक्षा अधिक होता. तर शेजारच्या अंबरनाथ शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या. संपूर्ण शहरात काळोख होता. भर दुपारी सांयकाळ झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होते आहे.