ठाणे : गणरायाला गुरुवारी निरोप दिला जाणार आहे. ठाण्यात विसर्जन सोहळ्यासाठी सार्वजनिक आणि घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जन मिरवणूका निघणार आहे. त्यामुळे ठाणे पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सुमारे पाच हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असणार आहे. विसर्जन घाटावर बाँबशोधक पथके आणि श्वान पथके तैनात असतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतूक बदल लागू केले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहत होतो. गणराय विराजमान झाले. परंतु आता निरोपाची वेळ झाली आहे. गुरुवारी गणरायाचे विसर्जन होणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातील विसर्जन घाट, कृत्रिम तलाव, खाडी किनारी पोलिसांचा चोख बंदोबस्त सज्ज झाला आहे. गुरुवारी काही सार्वजनिक गणेश मुर्तींचे देखील विसर्जन होणार आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात मिरवणूका निघणार आहे. ठाणे पोलिसांचे पथके साध्या गणवेशात गस्ती घालून मिरवणूकींच्या मार्गावर लक्ष ठेवणार आहेत.

हेही वाचा : किरकोळीत ‘घाऊक’ लूट, घाऊक बाजारात दोन ते पाच रुपयांची दरवाढ; किरकोळीत भाज्यांचे दर दुप्पट

ठाणे शहरात ठिकठिकाणी विसर्जन होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. त्यामुळे स्थानक परिसर, मासुंदा तलाव परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. वाहतूक बदलामुळे पर्यायी मार्गांवर कोंडी होण्याची शक्यता आहे. साकेत, कळवा, विटावा येथून सिडको किंवा स्थानक परिसराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना कळवा खाडी पुल तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवेश बंदी असेल. येथील वाहने कोर्टनाका, बाजारपेठ, जांभळीनाका मार्गे वाहतूक करतील. चरई, जिल्हा शासकीय रुग्णालय येथून टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना महापालिका शाळेजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळीनाका, बाजारपेठ मार्गे वाहतूक करतील. ठाणे रेल्वे स्थानक येथून सॅटीस पुल मार्गे मासुंदा तलावाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या टीएमटी आणि राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांना गोखले रोड मार्गे वाहतूक करावी लागेल. तर स्थानक परिसरातून रिक्षा तसेच इतर हलक्या वाहने मुस रोडमार्गे वाहतूक करतील.

गोखले रोड येथून राम मारूती रोडने मासुंदा तलावाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गजानन महाराज चौक, दगडी शाळा मार्गे वाहतूक करतील. अल्मेडा चौक, राम मारूती रोड येथून ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने राम मारूती रोड, गोखले रोड मार्गे वाहतूक करतील. चरई, गडकरी चौक येथून वाहतूक करणाऱ्या वाहनांना दरबार उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने सेंट जाॅन शाळा, मालतीबाई चिटणीस रुग्णालय, चिंतामणी चौक किंवा टेंभीनाका मार्गे वाहतूक करतील. गडकरी चौकातून चिंतामणी चौक आणि मुस चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेशबंदी असेल. टाॅवरनाका, गडकरी रंगायतन, बोटींग क्लब पर्यंत मासुंदा तलावाच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास प्रवेशबंदी असेल. तसेच ठाणे महापालिका भवन ते अल्मेडा चौक, ओपन हाऊस, आराधना चौक, भक्ती मंदीर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास बंदी असेल. या अधिसूचना दुपारी २ ते रात्री मिरवणूकासंपेपर्यंत लागू असेल.

हेही वाचा : गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा लाटला; शिधा विकण्यासाठी नेत असताना जप्त, दोघांवर गुन्हा

पोलीस अधिकारी बंदोबस्त

चार अपर पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, १३ साहाय्यक पोलीस आयुक्त, ९५ पोलीस निरीक्षक, २४९ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ३५ महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ९० प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आणि ११ विशेष शाखेचे पोलीस अधिकारी अशा एकूण ५०७ अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. यासह राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या, ८०० महिला आणि पुरूष गृहरक्षक, बाँब शोधक शाखेची पाच पथके असा ४ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane traffic route changes on the occasion of ganesh visarjan 2024 css