शिळफाटा येथे जलवाहिनी फुटली
डोंबिवली : ठाणे, नवी मुंबई परिसराला पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी शनिवारी सकाळी खिडकाळी आणि देसाई गावाजवळ फुटली. यामुळे ठाणे, नवी मुंबईला रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
काटई ते खिडकाळी, देसई गावांच्या दरम्यान जलवाहिनी फुटण्याची गेल्या वर्षभरातील ही सातवी घटना आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर त्याचा आर्थिक फटका वेळोवेळी एमआयडीसीला बसत आहे. खिडकाळी आणि देसई गावाजवळ पण जलवाहिनी फुटून पाणी रस्त्यावर आले. उर्वरित आठ महिने बारवी धरणात पुरेसा पाणी साठा असावा म्हणून शासन नोव्हेंबरपासून पाणी कपातीला सुरूवात करते. असे असताना दर महिन्याला शिळफाटा रस्त्यावर जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे खिडकाळी, देसई परिसरातील जलवाहिनी फुटीची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी करीत आहेत.
दुरुस्तीसाठी…बारवी धरणातून बदलापूर-काटई रस्त्याने येणाऱ्या जलवाहिन्यांमधून नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, मिरा-भाईंदर, या भागातील निवासी, औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिन्या फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी या शहरांना होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. रात्री पाणीपुरवठा सुरू केला जाणार असला तरी जलवाहिन्यातून पूर्णक्षमतेने पाणी पुरवठा सुरळीत होण्यास सहा ते सात तास लागतात. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा, मिरा-भाईंदर शहरांना रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एमआयडीसी महापे विभागाचे उपअभियंता एस. एम. गिते यांनी दिली.