मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही ठाकरे समर्थक खासदाराने आपल्या समर्थकांसोबत या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिंदे आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.

मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
ठाण्यातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत पार पडला ध्वजारोहण सोहळा

ठाणे शहरातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवली आहे. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती तीच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवल्याचं पहायला मिळालं. एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमाला मोठ्या संख्यने शिंदे समर्थक उपस्थित होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटात असलेले खासदार राजन विचारे यांना पोलिसांनी नोटीस देऊन देखील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आल्याने काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.

नक्की वाचा >>  विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण

आनंद दिघेंनी सुरु केलेल्या कार्यक्रमासाठी ध्वजारोहण करण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात होते. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येण्याची शक्यता असल्याने ठाणे पोलिसांनी शिवसेनेतील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ध्वजारोहणास अटकाव करून नोटीसा बजाल्या होत्या. मात्र यासंदर्भात बोलताना शिंदे यांनी ज्यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यायचं होतं त्यांनी यावं असं सांगण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. या कार्यक्रमावेळी शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगला.

नक्की वाचा >> Independence Day: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा भारतासाठी खास संदेश; महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले, “अमेरिकेतील भारतीयांनी…”

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी, “अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य दिले असून त्यांना अभिवादन करतो. आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

राजन विचारेंच्या उपस्थितीबद्दल काय म्हणाले?
राजन विचारे उपस्थित राहण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता शिंदेंनी “मी पोलिसांना सूचना दिल्या होत्या की जे सहभागी होतील त्यांना येऊ द्या” असं उत्तर दिलं.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाणे मॅरेथॉनमध्ये करण शर्मा विजेता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी