ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री दिवा शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. या अंतर्गत धर्मवीर नगर येथे सभा सुरू असतानाच या परिसरात विद्युत पुरवठय़ामध्ये तांत्रिक बिघाड होऊन रामजीयावन विश्वकर्मा (५५) यांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडूनही या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने विविध चर्चाना उधाण आले आहे. भाजपने या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ही घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.

दिव्यातील विकासकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. बुधवारी रात्री आगासन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे भाषण करत असताना सभास्थानापासून काही मीटर अंतरावर विद्युत तारेत बिघाड झाला. या घटनेत रामजीयावन विश्वकर्मा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी डायघर भागातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

ही घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असतानाही शिळ-डायघर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. ही घटना कशी घडली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारास निष्काळजीपणा करणारे आयोजक शिंदे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

चौकशीची आव्हाडांची मागणी

मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान विद्युत जोडणी कोणत्या मीटरमधून घेतली, ते मीटर अधिकृत आहे की अनधिकृत याबाबत अधिक तपास करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. १५ ते २० वर्षांमध्ये एखाद्या शहरात जाऊन या ठिकाणी सर्व मीच केले, असे आपण सांगता. तेव्हा असे घडते, अशी टीकाही त्यांनी केली.

नियमांचे उल्लंघन केल्याचा ठाकरे गटाचा आरोप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा रंगमंच उभारण्यात आलेला दिवा-आगासन हा मुख्य रस्ता बुधवार सकाळपासूनच नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्यात आला होता. कोणताही रस्ता पूर्णपणे बंद करून त्या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्याचा अवमान आयोजकांनी केल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडिगावकर यांनी केला. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचा आदेश लागू असतानाही आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही घाडिगावकर यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man died due to electric during cm eknath shinde rally in thane zws