पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीतून ठाणेकरांची आजपासून होणार सुटका, बहुप्रतिक्षित कोपरी रेल्वे पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण | most awaited Kopri Railway Flyover will be inaugurated today by CM Eknath Shinde | Loksatta

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीतून ठाणेकरांची आजपासून होणार सुटका, बहुप्रतिक्षित कोपरी रेल्वे पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण

वाहन चालकांना एकूण आठ पदरी मार्गिका उपलब्ध होणार असून कोंडीतून ठाणेकरांची सुटका होणार आहे.

Kopri Railway Flyover, Thane, Mumbai, traffic , CM Eknath Shinde
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीतून ठाणेकरांची आजपासून होणार सुटका, बहुप्रतिक्षित कोपरी रेल्वे पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण ( संग्रहित छायाचित्र )

किशोर कोकणे

ठाणे : मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गिकेच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपूलाचे आज दुपारी १:३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल दुपारनंतर वाहतूकीसाठी सुरू होणार असून वाहन चालकांसाठी एकूण आठ पदरी मार्गिका उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दररोज कोपरी पूलाच्या कोंडीतून ठाणेकरांची अखेर सुटका होणार आहे.

हेही वाचा… कल्याण: रेल्वे प्रवासात विसरलेले २४ लाखाचे दागिने प्रवाशाला परत; लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा कोपरी उड्डाणपूल हा वाहतूकीच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग धोकादायक तसेच अरुंद असल्याने २०१८ पासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वेकडून हा उड्डाणपूल तोडून त्याठिकाणी आठ पदरी पूल करण्याचे काम सुरू केले होते. एमएमआरडीएने दोन टप्प्यात या पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी या पूलाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच, मुख्य पूलालगत दोन अतिरिक्त मार्गिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या अतिरिक्त मार्गिका सुरू झाल्यानंतर एमएमआरडीए आणि रेल्वेने मुख्य उड्डापणूलाच्या मार्गिकेच्या निर्माणाचे म्हणजेच, मुख्य पूलाचे काम हाती घेतले होते.

हेही वाचा… ठाणे जिल्हा नियोजन समिती बैठकीला काही विभागाचे अधिकारी गैरहजर , पालकमंत्री शंभूराज देसाई संतापले

मुख्य पूलाच्या मार्गावर काम सुरू झाल्याने कोपरी येथील सेवा रस्त्यावर वाहनांचा भार वाढला होता. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत होता. अनेकदा सकाळी तीन हात नाका उड्डाणपूलापर्यंत वाहतूक कोंडी होतं. त्यामुळे मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल होत असत. काही दिवसांपूर्वीच हा पूल तयार झाल्याची चर्चा होती. परंतु त्याचे लोकार्पण झाले नसल्याने पूल बंद होता. अखेर आज या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना एकूण आठ पदरी मार्गिका उपलब्ध होणार असून कोंडीतून ठाणेकरांची सुटका होणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 10:15 IST
Next Story
विश्लेषण: संजय केळकर ठाणे भाजपमधील वाढत्या असंतोषाचे प्रतीक आहेत का?