बदलापूर ते डोंबिवली रेल्वे प्रवासाच्या दरम्यान लोकल डब्यात असलेल्या एका महिलेच्या हातामधील मोबाईलवर चोरट्याने पाळत ठेवली. हा मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा बेत डब्यात प्रवासी म्हणून असलेल्या चोरट्याने आखला होता. डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची लोकलमध्ये चढताना गर्दी होताच, महिलेच्या हातामधील मोबाईलवर टपून बसलेल्या चोरट्याने तो मोबाईल हिसकावून डब्यातून उडी मारून पळ काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलेसह इतर प्रवाशांनी चोर म्हणून मोठ्याने आरडाओरडा केला. चोर भरधाव वेगाने पळत होता. प्रवाशांचा ओरडा डोंबिवली रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेल्या पोलिसांना ऐकू आला. त्यांनी लोकल डब्याजवळ जाऊन विचारणा केली, तेव्हा त्यांना एका महिला प्रवाशाच्या हातामधील मोबाईल हिसकावून समोर चोर पळत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. पोलिसांनी तात्काळ चोरट्याचा पाठलाग करून जीने चढत असतानाच त्याचा पाय खेचून त्याला खाली पाडले. तेथेच त्याला जेरबंद केले. एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा थरार काही क्षण फलाटावर सुरू होता.

रेल्वे पोलिसांनी चोराला पकडून लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. अली गुलमोहर अन्सारी (२०, उल्हासनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अली अन्सारीने यापूर्वी अशा मोबाईल चोरीच्या घटना कोणत्या स्थानकावर केल्या आहेत. चोरीचे मोबाईल त्याने कुठे विकले आहेत. याची चौकशी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलिसांनी सांगितले, बदलापूर येथील रहिवासी नंदिनी मिश्रा या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे लोकलने चालल्या होत्या. बदलापूर स्थानकात लोकलमध्ये बसून त्यांनी प्रवास सुरू केला. या डब्यात चोरटा प्रवासी म्हणून चढला होता. त्याचे लक्ष नंदिनी यांच्या मोबाईलवर होते. त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जायचा बेत चोरटा अन्सारीने आखला होता. ती संधी त्याला मिळत नव्हती. डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी होताच, बाजुलाच बसलेल्या नंदिनी यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून अन्सारीने पळ काढला. प्रवाशांच्या जागृततेमुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway police arrest mobile thief in dombivli sgy