ठाणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यानुसार, सोमवारी सकाळी पालिकेने शहरात ग्रंथ दिंडी काढली होती. ग्रंथ दिंडीनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील चौकापासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. परमार्थ निकेतन, ज्ञानराज मंदिरमार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगण अशी हि दिंडी काढण्यात आली. लेझिम, ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या दिंडीत अतिरिक्त आयुक्तसंदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदापुरे, उमेश बिरारी, अनघा कदम, मिताली संचेती, मनोहर बोडके, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, सचिन सांगळे, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख, महापालिका कर्मचारी हे पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. फुलांनी सजवलेल्या पालखीत ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान यांच्यासह वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकांचे साहित्य ठेवण्यात आले होते. मुख्यालयात दिंडी आल्यानंतर महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले.

हेही वाचा >>>डोंबिवलीत देवीचापाडा येथील जुगार, गांजाच्या अड्डयांमुळे नागरिक त्रस्त

ग्रंथदिंडी विसर्जित झाल्यानंतर पालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा संवर्धनासाठी हा मराठी भाषेचा पंधरावडा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यापैकी ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन सोमवारी आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन आणि पुस्तक विक्री मंगळवार, २१ जानेवारी रोजी सुरू राहणार आहे. ते सर्व नागरिकांसाठी खुले आहे. त्यामुळे या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. तसेच, वाचन या छंदाला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. या प्रदर्शनात किमान पाचशे रुपयांची पुस्तके तरी प्रत्येकाने आपल्या मराठी भाषेसाठी, मराठी मातीसाठी विकत घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रंथ दिंडी तसेच प्रदर्शनाच्या सोहळ्याचे सूत्र संचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

प्रदर्शन नागरिकांसाठी खुले

महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहातील प्रदर्शन आणि पुस्तक विक्री ही नागरिकांसाठी खुली आहे. मंगळवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. त्यात, प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्याकडील दुर्मिळ आणि जुनी पुस्तके पाहता येतील. तसेच, त्यांच्यासह विविध स्टॉलवर पुस्तकांची खरेदीही करता येईल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation initiative on the occasion of pandhavada to promote marathi language amy