ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसेच धोकादायक जाहिरात फलक ठेकेदाराने स्वखर्चाने काढून भंगारात विकून त्या मोबदल्यात पालिकेला पैसे देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार पालिकेने दोन वर्षांसाठी भंगार विक्रिचा ठेका देण्यासाठी दरपत्रके मागविली असून यानुसार पालिकेकडे प्राप्त झालेल्या चारपैकी एकाचा दर २६ रुपये ७० पैसे इतका आहे. हा दर तीन दरपत्रकांपेक्षा जास्त असल्याने त्यास पालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली आहे. यामुळे पालिकेला आता भंगार विक्रितून पालिकेला प्रति किलोमागे २६ रुपये ७० पैसे मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घाटकोपरमधील जाहीराक फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदा जाहीरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावरून टिका होऊ लागताच ठाणे महापालिकेने बेकायदा जाहीरात फलकांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईत शहरातील ४९ जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली होती. ४९ पैकी ५ जाहिरात फलक पुर्णपणे निष्कासित करण्यात आले होते, तर परवानगी पेक्षा जास्त आकाराच्या ४४ जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला होता. याशिवाय, पाालिकेने जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे धोकादायक आहेत की नाही, याची पाहाणी करण्यासाठी संबंधित कंपनी मालकांना फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार २६० जाहिरात कंपन्यांनी जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले होते. या पाठोपाठ आता पालिकेने बेकायदा आणि धोकादायक फलकांचे लोखंडी सांगाडे नियुक्त ठेकेदाराने स्वखर्चाने काढून घेऊन भंगारात विकणे आणि त्या बदल्यात पालिकेला किलोमागे पैसे देणे, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संबंधीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. त्यास आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर तो प्रशासकीय सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यास प्रशासकीय सभेनेही मान्यता दिली आहे.

काय आहे प्रस्ताव

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसेच धोकादायक जाहिरात फलक स्वखर्चाने काढून घेणे आणि भंगारात विकून त्या मोबदल्यात पालिकेस प्रतिकिलो जास्तीत जास्त पैसे देणे या निकषावर आधारीत पालिकेने दोन वर्षांकरिता दर पत्रके मागविली होती. यामध्ये चारजणांनी दरपत्रके पालिकेक़डे सादर केली होती. यानुसार नवी मुंबईतील मे. सादिक स्क्रॅप मर्चंट कंपनीने लोखंडी साहित्य प्रतिकिलो १५ रुपये तर, लाकडी साहित्यसाठी प्रति किलो २ रुपये असा दर दिला होता. ठाण्यातील मे. ब्राईट कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपर्स कंपनीने लोखंड प्रति किलो २३ रुपये ५ पैसे, मे. साईराज स्क्रॅप ट्रेडर्स कंपनीने लोखंड प्रति किलो २६ रुपये २५ पैसे तर, मे. मुस्ताक स्क्रॅप ट्रेडर्स कंपनीने लोखंड प्रति किलो २६ रुपये ७० पैसे असे दर पत्रक सादर केले होते. यापैकी मे. मुस्ताक स्क्रॅप ट्रेडर्स कंपनीचे दरपत्रक स्विकारण्यास पालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली असून यामुळे पालिकेला आता भंगार विक्रितून पालिकेला प्रति किलोमागे २६ रुपये ७० पैसे मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation will sell illegal advertisement boards as scrap asj