नीलेश पानमंद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या पावसाळय़ात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा, यासाठी राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून ठाणे शहरात २८३ रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत असले तरी शहरातून जाणाऱ्या मुंबई- मुंबई नाशिक आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या मुंबई- अहमदाबाद महामार्गावर खड्डे पडले आहेत. मुंबई, पालघर, नवी मुंबई या शहरांना जोडण्यात आलेल्या या मार्गामुळे महमुंबईची कोंडी होत आहे. तर कल्याण- डोंबिवली आणि भिवंडी शहरात अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे बुजविण्यासाठी २० कोटींची तरतूद आहे. पावसाळय़ापूर्वीची खड्डे बुजविण्याची जुजबी कामे करण्यात येतात. पाऊस सुरू होताच बुजवलेले खड्डे उखडतात. पालिका हद्दीतील ठाकुर्ली रस्ता, कल्याणी रस्ता, मोहने रस्ता, जोशी शाळा रस्ता, गणेश नगर रस्ता, गोविंद वाडी रस्ता, मानपाडा रस्ता या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. कल्याण येथील मलंग रस्त्यावरील खड्डयांमुळे सुरज गवारी या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले असून यंदाच्या वर्षांतील हा जिल्ह्यातील पहिला खड्डेबळी आहे. भिवंडी शहरातील भिवंडी- कल्याण रोड, धामणकर नाका, भंडारी कम्पाऊंड, अंजूरफाटा, तीनबत्ती नाका, खडीपार नाका, नदी नाका, चर्णीपाडा, कमला हॉटेल आणि गोपालनगर या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कशेळी टोलनाका ते बाळकूम खाडीपर्यंत खड्डे पडले आहेत. भिवंडी शहरातून अवजड वाहतूक सुरू असते. यामुळे पाच मिनिटांच्या अंतरासाठी १५ ते २० मिनिटांचा अवधी लागत आहे. शालेय विद्यार्थी तासनतास कोंडीत अडकून पडत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बहुतांश काँक्रीट रस्ते असल्यामुळे या ठिकाणी खड्डय़ांचे प्रमाण कमी आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion in greater mumbai due to potholes in the district amy