आपल्यातील अनेकजण प्राणीप्रेमी असतात. आपल्या लहान बाळाप्रमाणे काही जण या प्राण्यांचा सांभाळ करतात. त्यांना घरी घेऊन जाऊन त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खायला देतात आणि त्यांना कुटुंबातील एक सदस्यच मानतात. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो अनेकांना मुक्या प्राण्यांची मदत करण्याची प्रेरणा देऊन जाईल. एक महिला रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वासराची मदत करते आणि त्याच्यासाठी नवीन घराची व्यवस्था करून देते, जे पाहून तुम्ही काही क्षणासाठी भावूक व्हाल.
महिलेला प्रवासादरम्यान एक वासरू रस्त्याकडेला उभे दिसते. दुधाच्या डेअरी जवळ हे वासरू दूध पिण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्या आईला शोधत असते. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर तिला समजले की, एक दिवस आधी या वासराला कोणीतरी इथे मुद्दाम सोडून गेलं आहे. कारण- हा नर वासरू होता आणि मालकाला त्याच्यापासून काहीच फायदा नव्हता. तसेच तिने हे वासरू कदाचित दोन महिन्याचे असेल असा अंदाज वर्तवला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महिला वासराला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेते आणि एका माणसाच्या मदतीने त्याला गाडीत बसवते. महिलेने कशाप्रकारे वासराला मदत केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
हेही वाचा… खचाखच भरलेल्या सरकारी बस माकडाची एन्ट्री! विंडो सीटवर बसून आनंदात केला प्रवास; पाहा Video
व्हिडीओ नक्की बघा :
वासराला दिलं नवं घर :
महिला वासराला गाडीत बसवून तिच्या घरी घेऊन जाते. घरी तिने एक कुत्रा पाळलेला असतो. वासराला गाडीतून आलेलं पाहून कुत्रादेखील आनंदी होतो. त्यानंतर महिला वासरासाठी नवीन घराची व्यवस्था करते. १२० किलोमीटर दूर एका निवारा गृहात इतर गुरांसह राहण्याची वासराची सोय करते. तसेच वासरू दुसऱ्या दिवशी त्याच्या नवीन घरी जाताना तुम्हाला दिसेल. नवीन घरी पोहचल्यावर वासराला अंघोळ घातली गेली आणि खायला हिरवा चाराही देण्यात आला आहे. रस्त्यावर सोडून गेलेल्या आणि दुधाच्या शोधात असणाऱ्या वासराला महिलेने अगदीच मोठ्या मानाने मदत केली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kartavyasociety या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. महिलेने या वासराचे नाव बंसी असे ठेवलं आहे. तसेच एकंदरीत या सर्व घटनेची सविस्तर माहिती तिने कॅप्शनमध्ये लिहिली आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून वासराची चिंता व्यक्त करत आहेत. तर काही जण महिलेने केलेल्या कार्याचे कौतुक करत आहेत आणि ‘तू अनेकांची प्रेरणा आहेस’, असे महिलेला आवर्जून कमेंटमध्ये म्हणताना दिसून आले आहेत.