भाईंदर : १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाईंदर मधील सनदी लेखापालाला अटक करण्यात आली आहे. विष्णू शर्मा(३५) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी त्याच्या कार्यालयात काम करण्यासाठी आली होती.

भाईंदर पूर्व भागात विष्णू शर्मा (३५) या सनदी लेखापालाचे कार्यालय आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये या कार्यालयात १९ वर्षाची पीडित कामासाठी रुजू झाली होती. पीडित मुलीचे वडिल या सनदी लेखापालाच्या परिचयाचे आहेत. नोकरीला लागल्यापासूनच आरोपी शर्मा पीडित मुलीचा लैंगिक छळ करत होता. मात्र नोकरीची गरज असल्याने तरुणीने याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान २८ मे रोजी शर्माच्या कुटुंबातील लोक बाहेर गेले असता त्याने तरुणीला कामानिमित्त भाईदर पुर्वेच्या राहुल पार्क येथील घरी बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा : अर्नाळा किल्ल्यातील समुद्रात २५ फुटांचा व्हेल मासा मृत अवस्थेत आढळला

या घटनेनंतर तरुणी मानसिक तणावाखाली होती. याबाबतची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार आम्ही आरोपी विष्णू शर्मा याच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे.